आठवले अजूनही आशावादी; भाजपा-सेनेला सुचवला मुख्यमंत्रिपद वाटपाचा नवा फॉर्म्युला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 04:19 PM2019-11-11T16:19:37+5:302019-11-11T16:29:50+5:30
'शिवसेना हा हिंदुत्ववादी विचारधारेचा पक्ष आहे. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणं उचित होणार नाही.'
भाजपाने सरकार स्थापन करण्यास नकार दिला असला आणि शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशा महाशिवआघाडी अस्तित्वात येण्याच्या हालचाली सुरू असल्या तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले अजूनही प्रचंड आशावादी आहेत. शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाऊ नये, असं आवाहन करत त्यांनी दोन्ही भावांना मुख्यमंत्रिपद वाटपाचा नवा फॉर्म्युला सुचवला आहे.
शिवसेना हा हिंदुत्ववादी विचारधारेचा पक्ष आहे. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणं उचित होणार नाही. त्यांच्यासोबत जाऊन अल्पकाळ टिकणारं सरकार स्थापन करण्यापेक्षा सेनेनं भाजपासोबतच राहावं. साडेतीन वर्षं भाजपाचा मुख्यमंत्री आणि दीड वर्षं शिवसेनेचा मुख्यमंत्री, असं वाटप करून दोघांनी आपापसातील वाट मिटवावा, असं रामदास आठवलेंचं म्हणणं आहे. शिवसेनेचे जे आमदार निवडून आलेत ते महायुतीमुळे आलेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांशी लढून निवडून आलेत. असं असताना, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन शिवसेनेनं मतदारांचा विश्वासघात करू नये, अशी आग्रही सूचना त्यांनी केलीय.
शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये महत्वपूर्ण भेट; शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार?
भाजपाचे काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात? अजित पवारांना केला फोन
शिवसेनेनं काँग्रेसचा पाठिंबा घेऊ नये, हे सांगतानाच, काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा देऊ नये, असंही आठवले यांनी नमूद केलं आहे. सेनेसोबत गेल्यास, धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून असलेला काँग्रेसचा जनाधार धोक्यात येऊ शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे. अर्थात, आठवलेंचा हेतू चांगला असला, तरी आजची राजकीय स्थिती पाहता तो प्रत्यक्षात येणं कठीणच दिसतंय.
शिवसेना खासदार संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल
भाजपाच्या मित्रपक्षांची अवस्था म्हणजे 'इकडं आड तिकडं विहीर'
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक १०५ जागांवर विजय मिळाला होता. मात्र, महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरून आग्रही भूमिका घेतल्याने भाजपाला सत्ता स्थापन करण्यात अपयश आले. त्यानंतर, राज्यपालांनी शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. या पार्श्वभूमीवर, आज सकाळपासून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी आणि बैठका सुरू आहेत. अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं शिवसेना रालोआमधून बाहेर पडणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.