जळगाव - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्ष जनतेला आकर्षित करण्यासाठी विविध घोषणाबाजी करत आहे. यात शिवसेना-भाजपा युतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असतानाही अद्यापही दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. शेतकरी कर्जमाफीवरुन त्यावेळी भाजप-शिवसेनेत मतभेद होते. आता उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केली असली तरी राज्याच्या तिजोरीला पेलवेल असेच निर्णय घेतले जातील अशा शब्दात गिरीश महाजन यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंच्या घोषणेवर चिमटा काढलेला आहे.
जळगावात गिरीश महाजन पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर उत्तर दिलं. इतके वर्ष राज्य केले, जनतेच्या मनात काय आहे ते तुम्हाला ओळखता आले नाही. आम्ही ते ओळखले म्हणून किती जागा येतील हे सांगू शकतो असा टोला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे. मात्र यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या घोषणाबाजीवरही भाष्य केलं होतं.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रत्येक सभेत शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती देणार असं आश्वासन देत आहे. तर दसरा मेळाव्यातही उद्धव ठाकरे यांनी गरिबांना १० रुपयात थाळी अन् १ रुपयात आरोग्य तपासणी करण्याचंही आश्वासन दिलं आहे. त्यामुळे कुठेतरी शिवसेनेच्या वचननाम्यातील काही गोष्टींवर भाजपा नेतेही नाराज असल्याचं कळून येत आहे. त्यामधूनच गिरीश महाजन यांनी राज्याला तिजोरीला पेलवेल असेच निर्णय घेतले जातील असं सांगितल्याने युतीत सर्व काही आलबेल नाही असचं चित्र पाहायला मिळत आहे.
इतकेच नाही तर सोलापूरच्या अक्कलकोट येथे झालेल्या सभेत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आगामी निवडणुकीत भाजपाला बहुमत द्या असं विधान केलं आहे. तर दसरा मेळाव्यात शिवसेना नेते संजय राऊत यांनी यंदाच्या निवडणुकीत शिवसेना १०० च्या पार गेली पाहिजे असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे महायुतीच्या माध्यमातून शिवसेना-भाजपा युती निवडणुकीला सामोरं जात असले तरीही या निवडणुकीत युतीपेक्षा स्वत:च्या पक्षातील जागा वाढविण्यासाठी दोन्ही पक्षाचे नेते प्रयत्न करत आहेत असं दिसून येतं.