मुंबईः राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली, तरी गेल्या दोन दिवसांपासून सत्तास्थापनेच्या हालचालींना आलेला वेग कमी झालेला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस बऱ्यापैकी सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या तीन पक्षांमध्ये सत्तावाटपाचं सूत्र आणि किमान समान कार्यक्रम ठरवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वाटाघाटी सुरू आहेत. त्यामुळे सोशल मीडियात आणि राजकीय वर्तुळातही, शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्याचं काय करणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या चर्चेला आपल्या शैलीत उत्तर दिलंय. लीलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याआधी त्यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली.
'उद्धवसाहेब, राज्यात महायुतीचंच सरकार यावं', शिवसैनिकाचं टॉवरवरून आंदोलन
भाजप संपर्कात असल्याच्या उद्धव ठाकरेंच्या दाव्यानंतर दानवे म्हणाले...
काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाताना हिंदुत्व आड येणार नाही का?, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, 'आम्ही काय धर्मांतर केलं आहे का? सगळेच हिंदू आहेत. शरद पवार हिंदू आहेत, अशोक चव्हाण हिंदू आहेत. प्रत्येक पक्षाच्या विचारधारेत थोडेफार मतभेद असतातच. प्रत्येक गोष्ट पटतेच असं नाही. भाजपाची आणि आमची विचारधारा एक होती, पण वेगळे झालोच ना?, असंही त्यांनी नमूद केलं. त्यातून, शिवसेनेची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जायची मानसिक तयारी स्पष्ट दिसते आहेच, पण येत्या काळात ते 'सॉफ्ट हिंदुत्वा'ची कास धरू शकतात, असंही सूचित होतंय.
शरद पवारांचा 'पॉवर'फूल गेम; 20 वर्षानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी घडविणार इतिहास?
मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, भीती बाळगू नका - शरद पवार
कुणाबरोबर जाण्यापेक्षा महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री देणं महत्त्वाचं आहे. भाजपाने शब्द देऊन पाळला नाही. महाराष्ट्रात दिलेल्या शब्दाला फार किंमत असते. अयोध्येत राम मंदिर बांधतोय, मग सत्यवचनी रामाचा विचारही घ्या, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. आमच्याकडे १७० आमदार आहेत आणि ते कसे येणार हे शरद पवारांना माहीत आहे, असंही त्यांनी सूचित केलं. राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणाऱ्या राज्यपालांनी सर्वच पक्षांवर अन्याय केला आहे, मुख्यमंत्री आमचाच होईल असं म्हणणाऱ्या आणि १५ दिवसांनी असमर्थता दर्शवणाऱ्या भाजपाचे कान राज्यपालांनी धरायला हवे होते, असा टोलाही त्यांनी लगावला.
छातीत दुखू लागल्यानं संजय राऊत यांना सोमवारी लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेज आढळून आल्यामुळे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होतं. आज त्यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.