मुंबई- विधानसभा निवडणुकांच्या मतदानात घटलेली टक्केवारीवरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी राजकीय नेत्यांच्या प्रचार मुद्द्यांवर टीका केली आहे. ५० टक्क्यांहून अधिक लोक मतदान करु इच्छित नाही, लोकांच्या मनातील जे मुद्दे आहेत ते लोकांना भिडत नाही. लोकांच्या खऱ्या समस्या वेगळ्या आहेत आणि राजकीय नेते वेगळे मुद्दे मांडत आहेत. त्यावर लोकांचा विश्वास नाही. मतदानाची टक्केवारी कमी होत चालली आहे ती संसदीय लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
तर राष्ट्रीय मुद्दे वेगळे असतात पण राज्यातील निवडणुकीतले मुद्दे वेगळे असतात. राज्यातील मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी. जिल्हा परिषद, महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा या प्रत्येक निवडणुका वेगवेगळ्या आहेत. लोकसभेच्या निवडणुका असतील तर गरिबी, भ्रष्टाचार, पाकिस्तान, समान नागरी कायदा, कुपोषण, तिहेरी तलाक, राष्ट्रीय सुरक्षा असे मुद्दे असतात असं संजय राऊतांनी सांगितले. तसेच राज्याच्या निवडणुकीत दुष्काळ, महागाई, बेरोजगारी असे विविध मुद्दे असतात. यामध्ये राजकीय नेते गफलत करत आहे.
राज्याच्या निवडणुकीत पाकिस्तानचा मुद्दा उचलून काय होणार? राम मंदिर, पाकिस्तान यावर लोकसभेत लोकांनी मतदान केले, यावर मतदारांनी युतीला निवडून दिलं. पण विधानसभेचे मुद्दे वेगळे आहेत असं सांगत संजय राऊतांनी एकप्रकारे भाजपाच्या प्रचारावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, राज्यातील निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून भाजपाचे दिल्लीतील सगळे नेते प्रचाराला आले होते. या निवडणुकीत भाजपाकडून कलम ३७० चा मुद्दा रेटून नेट्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावर विरोधकांनीही कलम ३७० चा महाराष्ट्राच्या निवडणुकीशी काय संबंध? असा प्रश्न उपस्थित केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यभरात ९ ते १० सभा झाल्या. या सर्व सभांमध्ये मोदींनी कलम ३७० हटविल्याचा उल्लेख केला. गृहमंत्री अमित शहांनीही प्रत्येक सभेत कलम ३७० हटविल्यामुळे जम्मू काश्मीर भारतात आलं हे स्वप्न पूर्ण झालं असा उल्लेख करत होते. त्यामुळे राष्ट्रीय मुद्द्यांमुळे राज्यातील विविध प्रश्न झाकले गेले. याचाच कुठेतरी फटका मतदानाच्या टक्केवारी झाला असेल असं अप्रत्यक्षरित्या संजय राऊत यांनी सांगितले आहे.