मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घोषणांचा पाऊस पाडला. युतीची सत्ता राज्यात आल्यानंतर दहा रुपयांत सामान्य माणसांना सकस जेवण दिले जाईल. एक रुपयात हृदयरोग आणि अन्य आरोग्य चाचण्या करण्यासाठी केंद्र उभे केले जाईल, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. उद्धव ठाकरेंच्या या घोषणेचा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोलापूरच्या बार्शीत आपल्या शब्दात समाचार घेतला.
उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवरील आपल्या घोषणेप्रमाणे शिवसेनेच्या वचननाम्यात 10 रुपयात सकस जेवणाची थाळी देण्याच आश्वासन दिलंय. शरद पवार यांनी बार्शी येथील उमेदवार निरंजन भूमकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभा घेतली. या सभेत बोलताना, शिवसेनेच्या 10 रुपयात थाळी देण्याच्या योजनेचा समाचार घेतला. यापूर्वी शिवसेनेकडून 1 रुपयात झुणका भाकर सुरू करण्यात आली होती. काय झालं त्याचं? झुणका भाकर केंद्र बंद पडली. मात्र, तेथील जागा हडपण्यात आल्या आहेत. त्या जागेवर इतर उद्योगधंदे सुरू असल्याचं पवार यांनी म्हटलं. तसेच, आम्ही तुम्हाला राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाक करायला, असे म्हणत 10 रुपयातील थाळीवरुन शिवसेनेला टोला लगावला. दरम्यान, यापूर्वी अजित पवार यांनीही 10 रुपयांच्या थाळीवरुन शिवसेनेला टोला लगावला आहे.