भाजपा-शिवसेनेचे नेते एकमेकांची तोंडं पाहायला तयार नसल्यानं महाराष्ट्रातील सत्तास्थापनेची कोंडी फुटायला तयार नाही. स्वतःला भाऊ-भाऊ म्हणवणाऱ्या दोन पक्षांमध्ये मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू आहे. दोघंही ती रस्सी तुटेपर्यंत ताणताना दिसत असल्यानं काही दिवसांपूर्वी एक वेगळंच सत्तासमीकरण पुढे आलं होतं. शिवसेनेच्या मदतीनं राष्ट्रवादी सरकार स्थापन करेल, काँग्रेस त्यांना बाहेरून पाठिंबा देईल आणि या सरकारचे मुख्यमंत्री शरद पवार असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु, आज स्वतः शरद पवार यांनीच या शक्यतेवर पडदा टाकला.
राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी, त्यांना 'ग्राउंड रिपोर्ट' देण्यासाठी शरद पवार यांनी आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शिवसेनेसोबत हातमिळवणी करणार का, या प्रश्नाचं उत्तर पवार-गांधी भेटीत दडलं असल्यानं त्याबद्दल उत्सुकता होती. परंतु, भेटीनंतर शरद पवारांनी या प्रकरणातील सस्पेन्स वाढवला आहे. आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश मिळाला आहे, सरकार स्थापन करण्याइतकं संख्याबळ आमच्याकडे नाही, असं सांगतानाच, शिवसेनेकडून प्रस्तावच नाही तर पुढे कसं जाणार?, असं सूचक विधानही पवारांनी केलं. सोनिया गांधींना पुन्हा भेटणार आहे, त्यानंतर कदाचित आम्ही सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करणार का, या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल, असंही त्यांनी नमूद केलंय. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, शरद पवार पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का, असा थेट प्रश्न पत्रकारांनी केला. त्याला तसंच थेट उत्तर शरद पवारांनी दिलं. दोन्ही हात नकारार्थी हलवत, 'नो' असं त्यांनी ठामपणे सांगितलं. त्यामुळे एक विषय संपला असला, तरी इतर अनेक विषय पवारांनी चर्चेसाठी दिले आहेत.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागावी, असं आम्हाला वाटत नाही. शरद पवारांना जनादेश मिळाला असता, तर ही वेळ येऊच दिली नसती, असंही त्यांनी भाजपा-सेनेला सुनावलं.