मुंबई: बहुमताचा दावा करण्यात अपयशी ठरल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी प्रथमच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी युतीवर थेट भाष्य करणं टाळलं. मात्र भाजपाला डिवचण्याची संधी त्यांनी सोडली नाही. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या भिन्न विचारसरणीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना यावेळी उद्धव ठाकरेंनी टोला लगावला. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी कसे काय एकत्र येणार, असे प्रश्न अनेकांना पडू लागले आहेत. त्यांना भाजपा आणि मेहबूबा मुफ्ती कसे एकत्र आले, असा प्रश्न मला विचारावासा वाटतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. जम्मू काश्मीरमध्ये भाजपा आणि मुफ्ती एकत्र कसे आले? नितीशकुमार-भाजपा कसे एकत्र आले? पासवान आणि भाजपा सोबत कसे आले? मोदी हटाव म्हणणारे चंद्राबाबू आणि भाजपा कसे एकत्र आले?, असे प्रश्न उद्धव यांनी उपस्थित केले. भाजपा आणि या विचारधारांचा संगम नेमक्या कोणत्या संगमावर झाला याची माहिती मागितली आहे, असा चिमटादेखील त्यांनी काढला. यावेळी उद्धव ठाकरेंना युती तुटली का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे भाष्य करणं टाळलं. ज्या गोष्टी करायच्या, त्या बेधडकपणे करेन. आत्ता मी जेवढं बोलतोय तेवढं बोलतोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपाच्या शुभेच्छांवरदेखील भाष्य केलं. ‘भाजपाने असमर्थता दर्शवल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला आघाडीसोबत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. आम्ही भाजपाला मित्र मानतो. मित्रानं दिशा दाखवली असेल आणि त्या दिशेनं न जाणं हा मित्रत्वाला कलंक ठरेल,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या अरविंद सावंत यांचे आभार मानले. मला अरविंद सावंत यांना धन्यवाद द्यायचे आहेत. शिवसेनाप्रमुखांचा शिवसैनिक कडवट असतो. आपल्या पक्षाला दिल्लीत विचित्र वागणूक मिळतेय, हे लक्षात येताच त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. असेच कडवट शिवसैनिक हीच माझी शक्ती असल्याचं ते म्हणाले.
महाराष्ट्र निवडणूक 2019: युती तुटली का?; उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर टाळलं, पण भाजपाला डिवचलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 9:30 PM