मुंबईः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिकाला बसवण्याचं वचन शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना देणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतःच राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणार असल्याचं समजतं. राष्ट्रवादी काँग्रेस थेट आणि काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्याच्या जोरावर शिवसेनेनं आज सत्तास्थापनेचा दावा केला आहे. मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाचीही चर्चा असली, तरी उद्धव ठाकरे यांनाच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींची पसंती आहे. उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं, असा हट्टच शिवसेना नेत्यांसह सर्व आमदार आणि शिवसैनिकांचा आहे. तो उद्धव मोडणार नाही, असा अंदाज वर्तवला जातोय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात खातेवाटपासंदर्भातही चर्चा झाली असून गृह आणि नगरविकास ही खाती राष्ट्रवादीकडे असावीत, यासाठी पवार आग्रही आहेत. वित्त आणि नियोजन खातं सुभाष देसाई यांच्याकडे सोपवलं जाईल, तर गृहमंत्रिपद जयंत पाटील यांना दिलं जाण्याची शक्यता आहे. अजित पवार यांना नगरविकास मंत्रालय दिलं जाऊ शकतं.
विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपानं, आपण सरकार स्थापन करू शकत नसल्याचं रविवारी राज्यपालांना कळवलं होतं. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या पाठिंब्याच्या जोरावर भाजपानं ११८ आमदारांचं संख्याबळ जमा केलं होतं. परंतु, छोट्या भावाने त्यांना मोठाच हादरा दिला.
भाजपा-शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वादाची ठिणगी पडली होती. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी शिवसेनेनं लावून धरली, भाजपावर शब्द फिरवत असल्याचा - खोटेपणाचा आरोप केला. याउलट, असा शब्द दिलाच नव्हता, या भूमिकेवर भाजपा ठाम राहिली. त्यामुळे गेले १८ दिवस राज्यातील सरकारस्थापनेचा गुंता सुटत नव्हता, मुख्यमंत्री ठरतच नव्हता. दोन भावांमधील वाद विकोपाला गेला आणि ३० वर्षांचं नातं तुटेपर्यंत ताणलं गेलं.
या पार्श्वभूमीवर, भाजपानं सरकार स्थापण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचं आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर आज दिवसभर गल्लीपासून दिल्लीपर्यंत वेगाने हालचाली घडल्या. हो-नाही करता-करता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्यास हिरवा कंदील दाखवला आणि राज्यात महाशिवआघाडीचं सरकार येणार यावर शिक्कामोर्तब झालं.