मुंबई: शिवसेनेच्या इतिहासात अनेक नेते पक्ष सोडून गेले. मात्र त्यातल्या नारायण राणे आणि ठाकरे कुटुंबाचं वैर कित्येक वर्ष टिकलं. आजही या दोन कुटुंबांमधील शत्रुत्व कायम आहे. राणे आणि ठाकरे कुटुंबाची पुढची पिढी राजकारणात सक्रीय झाल्यानंतरही या दोन्ही कुटुंबातील वाद तसाच आहे. ठाकरे आणि राणे यांनी अनेकदा एकमेकांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. आता नारायण राणे आणि त्यांचे धाकटे चिरंजीव नितेश राणे भाजपात गेले आहेत. त्यामुळे ठाकरे आणि राणे कुटुंबातील वाद संपुष्टात येईल अशी चर्चा सुरू होती. भाजपा आणि शिवसेनेची युती असल्यानं मी शिवसेनेच्या उमेदवाराचादेखील प्रचार करेन, असं थोड्याच दिवसांपूर्वी नितेश राणेंनी म्हटलं होतं. मात्र संकट काळात माझ्यासोबत राहिलेल्या शिवसैनिकांना मी वाऱ्यावर सोडणार नाही, असं सूचक विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत केलं. कोकणात एका मतदारसंघात नितेश राणे यांच्यासंदर्भात शिवसेनेकडून एका अधिकृत उमेदवाराला 'एबी' फॉर्म दिला आहे. त्याचं काय, असा सवाल उद्धव यांना विचारण्यात आला. त्यावर सगळ्यांची उत्तरं तुम्हाला मिळतील. एकही प्रश्न अनुत्तरित राहणार नाही. काही उत्तरांना थोडासा वेळ लागेल, असं उत्तर उद्धव यांनी दिलं. उद्धव यांनी दिलेल्या उत्तरावर त्यांना म्हणजे संघर्ष कायम राहणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संकट काळात जो शिवसैनिक माझ्यासोबत राहिला, माझ्यासाठी म्हणून उभा राहिला. शिवसेनेसाठी उभा राहिला तो मला मोलाचा आहे आणि म्हणून प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता देऊ शकत नाही. दोन-तीन दिवसांत मिळतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.राज्यभरात भाजपा-शिवसेनेची युती असताना तळकोकणात मात्र एकाच मतदारसंघात दोन्ही पक्षांचे अधिकृत उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. नारायण राणेंचा मुलगा आणि माजी आमदार नितेश राणे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशीच भाजपात प्रवेश केला. तर त्याचवेळी भाजपाचे नेते संदेश पारकर यांनी बंड करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुसऱ्या दिवशी नारायण राणेंचे उजवे हात समजले जाणारे सतीश सावंत यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. यामुळे पारकर यांनी माघार घेत सावंत यांनाच युतीचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करून टाकले.
Maharashtra Election 2019: राणेंविरुद्धचा संघर्ष कायम राहणार का?; उद्धव ठाकरेंचं सूचक उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 11:39 AM