Maharashtra Election 2019: 'त्या' नेत्याला उद्धव ठाकरेंकडून बिभीषणाची उपमा?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 02:07 PM2019-10-08T14:07:54+5:302019-10-08T14:08:29+5:30
काँग्रेस, राष्ट्रवादीतील गळतीवर उद्धव ठाकरेंचं भाष्य
मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग झालं. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षाची अवस्था वाईट झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले अनेक नेते शिवसेना आणि भाजपामध्ये दाखल झाले. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं.
राज्यातील राजकारणात गेल्या पाच वर्षांमध्ये विरोधी पक्ष नेत्याची भूमिका शिवसेनेनंच वठवली, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावेळी जो विरोधी नेता, त्याचं काय झालं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यावर या लोकशाहीतला सर्वात मोठा घोटाळा आहे, असं सामनाच्या संपादकांनी म्हटलं. यावर भाष्य करताना हे लोकशाहीतलं युद्ध आहे. त्याच्यामध्ये त्याही वेळेला ते बिभीषण विभीषण तिथले इथे, इथले तिथे आलेच होते. ते आता याबाबतीत येताहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पाच वर्षे सत्ता राबवल्यानंतरही निवडणूक प्रचारात काँग्रेस, राष्ट्रवादीला लक्ष्य करणार का, असा प्रश्न यावेळी उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर ते जर आम्हाला टार्गेट करणार असतील, तर आम्हालादेखील त्यांना टार्गेट करावं लागलं. जर ते आमच्या पाच वर्षांच्या कारभारावर बोलणार असतील, तर आम्हालाही त्यांच्या पन्नास वर्षांच्या नाकर्तेपणावर, किंबहुना भ्रष्टाचारावर बोलावं लागेल. विषय सरळ आहे.. ते जर का आम्हाला टार्गेट करत असतील तर आम्ही काय हात जोडून त्यांना सामोरे नाही जाणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले.