मुंबई: भाजपापासून दूर गेलेली शिवसेना लवकरच राज्यात लवकरच सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे नेते थोड्याच वेळात राज्यपालांची भेट घेणार आहेत. या भेटीत शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो. सध्या याच पार्श्वभूमीवर राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. शिवसेना नेते सकाळपासून राष्ट्रवादी, काँग्रेसच्या संपर्कात असल्यानं राज्यपालांच्या भेटीत नेमकं काय घडणार, त्याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. आज दिवसभर राजकीय वर्तुळात भेटीगाठी आणि बैठकांचं सत्र सुरू आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर थोड्याच वेळापूर्वी उद्धव यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचं समजतं आहे. तत्पूर्वी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार अनिल देसाई सकाळपासून काँग्रेसच्या, तर उद्धव ठाकरे शरद पवारांच्या संपर्कात होते. त्यामुळे राज्यात 'महाशिवआघाडी'चं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडी वेगानं सुरू असताना शिवसेना नेते थोड्याच वेळात राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. या भेटीत नेमकं काय होणार, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. शिवसेना या भेटीत बहुमताचा दावा करणार की राज्यपालांकडून अधिक वेळ मागून घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. भाजपाला राज्यपालांनी ७२ तासांचा अवधी दिला होता. त्या तुलनेत शिवसेनेला अतिशय कमी वेळ मिळाल्याचं आज सकाळीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.
महाराष्ट्र निवडणूक 2019: उद्धव ठाकरेंची सोनिया गांधींशी 'फोन पे चर्चा'; शिवसेना नेते थोड्याच वेळात राजभवनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 4:34 PM