ब्रेकिंगः महाराष्ट्रात 'महाशिवआघाडी'चं सरकार; शिवसेनेला पाठिंबा द्यायला अखेर काँग्रेस तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 06:06 PM2019-11-11T18:06:57+5:302019-11-11T18:23:39+5:30
राज्यात नवं सत्ता समीकरण दिसणार
हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन गेली ५० वर्षं राजकारण करणाऱ्या शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेसनं अखेर हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 'महाशिवआघाडी'चं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
विधानसभा निवडणुकीत १०५ जागा जिंकून भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या पाठिंब्यांच्या जोरावर त्यांचं संख्याबळ ११८ पर्यंत गेलं. मात्र, मोठा भाऊ आणि छोटा भाऊ - अर्थात भाजपा-शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वादाची ठिणगी पडली आणि त्याचा भडका उडाला. त्यामुळे ३० वर्षांपासूनचे हे मित्र सरकारस्थापनेसाठी एकत्र आले नाहीत. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी शिवसेनेनं लावून धरली, भाजपावर शब्द फिरवत असल्याचा - खोटेपणाचा आरोप केला. याउलट, असा शब्द दिलाच नव्हता, या भूमिकेवर भाजपा ठाम राहिली. त्यामुळे 'भाऊबंध' संपला आणि 'भाऊबंदकी' सुरू झाली. अखेर, आपण सरकार स्थापन करू शकत नसल्याचं भाजपानं रविवारी संध्याकाळी राज्यपालांना कळवलं.
Sources: Congress Interim President Sonia Gandhi speaks to some party MLAs from Maharashtra who are lodged in a Jaipur hotel. pic.twitter.com/cHqoUaxDFe
— ANI (@ANI) November 11, 2019
त्यानंतर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केलं होतं आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत हालचालींना वेग आला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादीच्या अनेक बैठका झाल्या. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, राष्ट्रपती राजवट टाळण्यासाठी शिवसेनेसोबत जाण्यास राष्ट्रवादीचे बहुतांशी नेते, आमदार तयार होतेच. त्यावर शरद पवारांनीही मोहोर उमटवली. पण, काँग्रेसकडून शिवसेनेला सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता.
Congress interim President Sonia Gandhi and Shiv Sena Chief Uddhav Thackeray had a brief telephonic conversation a short while back pic.twitter.com/DfgYPbW5kD
— ANI (@ANI) November 11, 2019
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी वेगवेगळ्या स्तरांतील नेत्यांची आणि आमदारांची मतं जाणून घेतली. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि अनिल देसाई अहमद पटेल यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधींशी फोनवरून चर्चा केली आणि पाठिंबा मागितला. तरीही, सोनिया गांधी यांचं मन वळत नव्हतं. अखेर, शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी महाशिवआघाडीला होकार दिल्याचं समजतं.