कणकवली - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला शेवटच्या टप्प्यात रंगत येऊ लागली आहे. राज्यात युती लढणारे पक्ष सिंधुदुर्गात मात्र एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. मोदींच्या नावावर शिवसेनेचे उमेदवार विजयी होतात. शिवसेनेच्या उमेदवारांच्या बॅनरवर मोदींचा फोटो मोठा लावलेला असतो. शिवसेनेने युती धर्म पाळावा अशा शब्दात कणकवलीचे भाजपा उमेदवार नितेश राणे यांनी शिवसेनेवर प्रहार केलेला आहे.
माध्यमाशी बोलताना नितेश राणे म्हणाले की, पालघरपासून कोकणापर्यंत एकच जागा भाजपाने मागितली ती म्हणजे कणकवली आहे. तिथेही शिवसेनेने उमेदवार दिला आहे. मोदींच्या नेतृत्वावर शिवसेना विजयी होतेय. राणेंना शिव्या देणं हाच शिवसेनेचा अजेंडा आहे. शिवसेनेवर टीका करु नये असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं म्हणून मी गप्प आहे. मात्र पक्षश्रेष्ठी या सर्व गोष्टी पाहत असतात, सगळ्या गोष्टींची नोंद ठेवली जाते त्यामुळे येणाऱ्या काळात त्याबाबत पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळी निर्णय घेतील असं त्यांनी सांगितले.
कणकवलीत शिवसेनेने उमेदवार दिलेला आहे, भाजपाने समंजस्याची भूमिका घेतली आहे शिवसेनेने चूक केली म्हणून आपण करु नये असं मत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. भाजपाचेही एबी फॉर्म जिल्ह्यातील मतदारसंघात वाटले गेले असते पण आम्ही तसं केलं नाही. भविष्यात मुंबईचा महापौर भाजपाचाच असेल असाही इशारा नितेश राणेंनी शिवसेनेला दिला आहे.
दरम्यान, निलेश राणे यांच्यासोबतच्या मतभेदावर बोलताना नितेश यांनी सांगितले की, आम्ही दोघंही रक्ताचे भाऊ असलो तरी दोघांचे एकमत असावं हे नसतं, आम्ही एकमेकांबद्दल आदर ठेऊन भूमिका मांडतो. त्याला माझी भूमिका स्पष्ट केली. आमचं मैत्रीचं नातं आहे. शेवटी वडिलांना ज्यांनी त्रास दिला त्याचा राग माझ्याही मनात आहेच. बाहेर कोणीही काही पसरावं त्याचा फरक पडत नाही असं ते म्हणाले.
तसेच आम्हाला पक्षात घेण्याचा भाजपाने जो निर्णय घेतलेला हा तो फक्त कणकवलीपुरता मर्यादित नाही, पालघरपासून संपूर्ण कोकणात भाजपा वाढविली पाहिजे अशी भूमिका आहे. २०२४ पर्यंत घराघरात भाजपा पोहचली पाहिजे यासाठी प्रयत्न सुरु आहेत असं सांगत नितेश राणेंनी शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे.