- संदीप प्रधान
दादा लहानपणी ‘धूम’ सिनेमा वरचेवर सीडी लावून पाहायचा. एक चोर आणि एक पोलीस... दोघे सुसाट बाइकवर... एकमेकांचा पाठलाग करताहेत, हीच काय ती सिनेमाची गोष्ट. पण, दादा पुन:पुन्हा ‘धूम’ बघून खूश व्हायचा. आपला लहानगा भाऊ गोजसला ‘धूम...धूम’ खेळायचा आग्रह करायचा. पण, दादा पोलीस व्हायचा आणि गोजस चोर. बंगल्याच्या अंगणात दोघे पाठलाग करायचे. दादाकडे दुचाकी तर गोजसकडे तीनचाकी सायकल. दादा पटापटा सायकल मारायचा आणि लहानग्या गोजसला जेरबंद करायचा.दादा आता मोठा झाला. दादाच्या घरातील तीन पिढ्यांत कुणी निवडणूक लढवली नव्हती. पण, दादानं घराण्याचं निवडणुकीचं उष्टावण केलं. घरच्यांना केवढं कोडकौतुक वाटायला लागलं. दादा निवडणुकीचा अर्ज दाखल करायला गेला आणि कुटुंब, नातलग, आप्तस्वकीय यांच्या देमार गर्दीत घुसलेल्या चोरांनी अनेकांचे खिसे साफ केले. कालपरवा नवा घरोबा केलेल्या भाऊंच्या पाकिटातील मोठी रक्कम गेली. दहीहंडीचं बक्षीस दिलं समजून भाऊ गप्प बसले. चेंबूरकर काकांचाही खिसा साफ केला गेला. वरळीकर मामांच्या खिशाला चोरांनी हिसका दाखवला, तर नलावडे भाईचा चेहरा पाहताच त्यांचे पाकीट मारल्याचे तो बोलत होता. अशा एकदोन नाही, तब्बल शंभरेक लोकांचे खिसे कापले गेले. काहींचे पिवळे गळे ओकेबोके झाले.दादा प्रचाराला बाहेर पडल्यावर जरतारी काठापदराच्या साड्या नेसलेल्या बायाबापड्या औक्षण करायला घराबाहेर येतात. दादा मोठ्या फॅमिलीतला असल्यानं तबकात चांगली ओवाळणी पडेल, अशी त्या बायाबापड्यांची अपेक्षा असते. दादाच्या मागं असलेला भाऊ, काका, मामा किंवा भाई ओवाळणीकरिता हिरवी नोट काढायला खिशात हात घालतो, तर बोटं आरपार जातात. भाऊचा चेहरा भलत्या ठिकाणी पॅण्ट फाटल्यासारखा होतो. लागलीच गर्दीतील कुणीतरी पुढं येऊन दादाच्या वतीनं ओवाळणी देऊन मोकळा होतो. पण, थोड्या वेळानं तोही खिशातून बोटं आरपार झाल्यानं हताश होतो. प्रचारयात्रेतील पोरीबाळी गळ्यातल्या चेन आणि मंगळसूत्र गच्च पकडून दादाच्या विजयाच्या घोषणा उच्चरवात देतात.दादाचा चोरांनी पिच्छाच पुरवलाय म्हणा की, दादानं आशीर्वादाकरिता यात्रा काढली. थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेत हे पोर उन्हातान्हात वणवण भटकलं. तिकडं पण तेच देमार गर्दीत कुणाची रोकड तर कुणाच्या गळ्यातील चेन गायब. दादाचा पिच्छा पुरवून एव्हाना चोर लखपती झाले, पण लाखांच्या गर्दीतील त्या चोराचा पत्त्या पोलिसांना लागत नाही. दादाचा अर्ज दाखल करण्याच्या रोड शोचं, प्रचारयात्रांचं फुटेज पोलिसांनी मागवलं. एकेक माणसाची चेहरेपट्टी केली. हिस्ट्रीशिटरच्या फायलीतील चेहरे गर्दीत हुडकण्याकरिता जंगजंग पछाडलं. सीसीटीव्ही फुटेज तपासलं. पण, चोर काही सापडेना. चोर कधी येतो आणि माल लंपास करून धूम ठोकतो, तेच कळेना झालंय. यापेक्षा चोर दादाच्या विरोधात रिंगणात उतरला असता, तरी चाललं असतं. पण, असं मागून येऊन सुफडासाफ करून निघून जाणं, हे चोर असलं म्हणून काय झालं, पण सभ्यतेचं लक्षण आहे का? हाच प्रश्न सध्या दादाला सतावतोय.