कणकवली - कणकवली मतदारसंघातून भाजपाकडून निवडणूक लढवत असलेले नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांचे संघाच्या कार्यक्रमातील छायाचित्र चर्चेचा विषय ठरले आहे. अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत भाजपाच्या विचारसरणीवर टीका करणाऱ्या नितेश राणे यांनी थेट संघाच्या कार्यक्रमास उपस्थिती लावल्याने त्यांना सोशल मीडियावरून ट्रोल करण्यात येत आहे, दरम्यान, स्वत: नितेश राणे यांनी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यामागचे नेमके कारण स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना नितेश राणे यांनी सांगितले की, ''मी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आता मी ज्या पक्षात आलो आहे. त्या पक्षाला समजून घेणे, त्या पक्षाच्या मातृसंस्थेला समजून घेणे गरजेचे आहे. म्हणून मी संघाच्या कार्यक्रमाला गेलो होतो.'' तसेच मला ओळखणारे लोक मला ट्रोल करणार नाहीत, असा विश्वासही राणेंनी व्यक्त केला. ''सत्तेची जोड मिळाल्यास मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडवता येतील. रखडलेले प्रश्न मार्गी लावता येतील. म्हणूनच भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. कोकणच्या विकास डोळ्यासमोर ठेवूनच आदरणीय नारायण राणेंनी भाजपाप्रवेशाचा निर्णय घेतला आहे,'' असे सांगत नितेश राणेंनी या निर्णयाचे समर्थन केले. दरम्यान, नितेश राणेंच्या या संघबैठकीचं वडील नारायण राणेंनी समर्थन केले होते. ''संघाच्या कार्यक्रमात जाणं यात चुकीचं काय. संघात जाणं चुकीचं नाही, मीही संघात जाईन, संघाच्या प्रमुखांना भेटेन. जायचंच तर मनापासून जायचं असं म्हणत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नितेश राणेंच्या संघ कार्यक्रमातील बैठकीचं समर्थन केलं आहे. माझी विचारधारा ही हिंदुत्ववादीच आहे. काँग्रेसमध्ये जाणं हा माझा नाईलाज होता,'' असेही स्पष्टीकरण राणेंनी दिले. भारतीय जनता पक्षाची विचारधारा मी मान्य केलीय आणि संघाची विचारधाराही मी मान्य करतो, असे म्हणत संघाच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिल, असेही राणेंनी म्हटले आहे.
Maharashtra Election 2019 :...म्हणून संघाच्या कार्यक्रमाला गेलो होतो, नितेश राणेंनी सांगितले नेमके कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 1:21 PM