शिर्डी - विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. अहमदनगर येथे विखे आणि थोरात यांच्यातील संघर्ष पुन्हा पाहायला मिळत आहे. आधी आम्ही एकाच पक्षात होतो, मात्र मी सत्ताधारी पक्षात आलो, माझे वडील मंत्री झाले. याचं सर्व श्रेय बाळासाहेब थोरातांना जातं. विधानसभेची निवडणूक झाल्यावर मी बाळासाहेब थोरातांचा फोटो माझ्या घरात लावणार आहे. असा टोला अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी लगावला आहे.
शिर्डी येथील सभेत बोलताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, मला प्रश्न पडतो, लोकसभेच्या तिकीटामागे गोंधळ कसा झाला? माझे वडील गेले, मी गेलो, राष्ट्रवादीकडे शेवटच्या क्षणापर्यंत तिकीटासाठी भांडलो. त्यानंतर मी भाजपात आलो, खासदार झालो. त्यानंतर मला हळूहळू उत्तर मिळायला लागलं. त्यानंतर मला समजलं की मला लोकसभेचं तिकीट का नाकारलं गेलं? याचं कारण मी सुशिक्षित आहे. राष्ट्रवादीचं म्हणणं असेल आमच्या पक्षाकडे वाळू तस्कर आहे, डाकू आहेत मग या डॉक्टरांचा काय काम आहे. माझ्यावर एकही गुन्हा नाही, त्याने गरिबाचे पैसे खाल्ले नाहीत. तुम्ही अजिबात येऊ नका असंही त्यांनी सांगितलं.
तसेच यापुढे राष्ट्रवादीच्या लोकांना भेटायला जायचं असेल तर जाऊ नका, कारण २ वर्ष थांबा यांची येरवडा जेलमध्ये रवानगी होईल त्यावेळी त्यांना भेटा. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना माज होता, सत्तेची गुर्मी आहे, त्यांना माहित नव्हतं की या देशात चौकीदार येणार आहे. तो तुमचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही असा घणाघात डॉ. सुजय विखेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केला.
दरम्यान, ईडीची केस झाली तर डोळ्यात पाणी आलं. हे डोळ्यातलं पाणी कुठे होतं जेव्हा आमच्या हक्काचं पाणी पळविले, हे पाणी कुठे होतं ज्यावेळी मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार केला. तुमच्या पापाचा घडा भरला आहे तुम्ही सर्वजण येत्या अडीच वर्षात जेलमध्ये जाणार आहे असा इशारा डॉ. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी नेते अजित पवार यांना दिला आहे.