...म्हणून तेल लावलेल्या पैलवानावर नागपूरला परतण्याची वेळ आली; काँग्रेसचा फडणवीसांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 09:36 AM2019-11-08T09:36:15+5:302019-11-08T10:16:19+5:30
५ वर्ष या सरकारने शेतकऱ्यांचा छळ केला, बेरोजगारी वाढली तरीही जनतेने या महायुतीला बहुमत दिलं
मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्याने विरोधी पक्षाकडून सत्ताधारी भाजपावर जोरदार टीका होऊ लागली आहे. महाराष्ट्रात घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. या परिस्थितीला भाजपा जबाबदार आहे. ज्यांनी अमेरिकेत जाऊन अबकी बार ट्रम्प सरकार असा नारा दिला आज त्या पक्षाला महाराष्ट्रात अबकी बार किसकी सरकार असं म्हणण्याची वेळ आली आहे असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपाला लगावला आहे.
यावेळी बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, ५ वर्ष या सरकारने शेतकऱ्यांचा छळ केला, बेरोजगारी वाढली तरीही जनतेने या महायुतीला बहुमत दिलं. मात्र या दोघांच्या अहंकारामुळे राज्यात सत्तास्थापन होऊ शकले नाही. भाजपाचे सर्व नेते आणि देवेंद्र फडणवीस यांना सत्तेची महत्वाची पदं स्वत:कडे हवीत. आम्ही काम करण्यासाठी एकत्र आलो आहोत, विचारांनी एकत्र आलो आहे, पदांसाठी नव्हे असं म्हणणारे मुख्यमंत्रिपदावर अडून आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच अनेक बहुजन नेतृत्व देवेंद्र फडणवीसांनी संपविले, तावडे, बावनकुळे, खडसे, पंकजा मुंडे यांना बाजूला सारलं गेलं. एसी-एसटीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती दिली नाही. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले ते पाहण्यासाठी केंद्रीय पथकही राज्यात आलं नाही. मुख्यमंत्रिपदासाठी सत्तास्थापन होत नाही. महाराष्ट्रात मुख्यमंत्री होण्यासाठी इतकी महत्वकांक्षा का आहे? असा सवालही अतुल लोंढे यांनी उपस्थित केला.
दरम्यान, तेल लावलेला पैलवान बिरुद मिरविलं, काँग्रेस-राष्ट्रवादी नावाला उरणार नाही अशा बाता मारल्या आज त्यांच्यावर दोन पैलवानांनी विजय मिळविला आहे. एक शरद पवार आणि दुसरी महाराष्ट्राची जनता यांनी दिलेल्या कौलमुळे आज त्यांना बॅगा भरुन नागपूरला येण्याची वेळ आली आहे अशा शब्दात काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी टीका केली आहे.
राज्यातील १३ व्या विधानसभेचा कार्यकाळ शनिवारी ९ नोव्हेंबरला संपत आहे. विधानसभा बरखास्त होत असताना राज्यातील सरकारचा कार्यकाळही संपुष्टात येतो. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.