परळी (जि.बीड) : निवडणूक प्रचाराचे समारोपीय भाषण करताना परळी येथे भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना भोवळ आल्याने त्या व्यासपीठावरच खाली बसल्या. खूप घाम आला होता. यावेळी त्यांच्या समवेत असलेले पती अमित पालवे यांनी त्यांना लगेचच रुग्णालयात नेले. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉ. वांगे यांनी सांगितले. शनिवारी सायंकाळी पावणेसहा वाजता हा प्रकार घडला.
शनिवारी हेलीकॉप्टरने सकाळी जिंतूर, कणेरवाडी, पाटोदा, परळी अशा चार ठिकाणी सभा केल्या. परळीची चौथी सभा होती. आपल्या निवडणूक प्रचाराची समारोपाची सभा संपली आणि पंकजा मुंडे व्यासपीठावरून खाली उतरत असताना अचानक अस्वस्थ झाल्या व स्टेजवरच त्यांना चक्कर आली. काही वेळात प्रथमोपचारानंतर त्या यशश्री निवासस्थानी गेल्या आहेत. यावेळी पती डॉ. अमित पालवे, खा.डॉ.प्रीतम मुंडे आदींसह पदाधिकारी सोबत होते.
विधानसभा निवडणुकीत प्रचाराची परळीत समारोप सभा झाली. राणी लक्ष्मीबाई टॉवर येथील या सभेला मंत्री पंकजा मुंडे यांनी जवळपास ४५ मिनिटे संबोधित केले. आपल्या जन्मभूमीतील या सभेत राजकीय भाषणापेक्षा आपल्या मनातील सर्व सलणाऱ्या, प्रचारात आप्तेष्टांकडूनच झालेले आरोप, त्यामुळे झालेल्या यातना या गोष्टी भाषणात मांडताना त्यांना गहिवरून आले होते. संपूर्ण भाषणात आपल्या भावना व्यक्त करताना त्या प्रचंड भावूक झाल्या होत्या. सकाळपासून विविध ठिकाणी सभा घेउन त्या परळीत आल्या असल्यामुळे थकवा आला होता. रात्री उशिरापर्यंतचे दररोज जागरण, दगदग होत होती. आजही त्यांना अतिश्रमाने खूप घाम आला होता. डीहायड्रेशन झाले होते. यात भावना उचंबळून आल्याने हा प्रकार घडल्याचे डॉ वांगे यांनी सांगितले.