मुंबई - भाजपाने कणकवली मतदासंघातून नितेश राणेंना उमेदवारी दिल्याने बंडखोरी करून शिवसेनेत प्रवेश करणारे कणकवलीतील नेते आणि नारायण राणेंचे कट्टर विरोधक संदेश पारकर यांनी नितेश राणे आणि नारायण राणेंवर बोचरी टीका केली आहे. ''नितेश राणेंना भाजपाच्या शाळेत दाखल करून संयमाचे धडे देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असले तरी नितेश राणेंसारखा उनाड विद्यार्थी कुठल्याही शाळेत घातला तरी सुधरणार नाही,''असा टोला पारकर यांनी लगावला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेना यांच्यात युती झाली असली तरी कोकणातील कणकवली मतदारसंघात शिवसेना आणि भाजपा यांच्यात सामना रंगला आहे. भाजपाने येथे नितेश राणेंना उमेदावारी दिल्याने शिवसेनेने युतीधर्म बाजूला ठेवत सतीश सावंत यांना उमेदवारी दिला आहे. दरम्यान, सतीश सावंत यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा बुधवारी कणकवलीत झाली. यावेळी नितेश राणेंविरोधात बंडखोरी करणाऱ्या संदेश पारकर यांनी हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी संदेश पारकर यांनी नारायण राणे आणि नितेश राणेंवर जोरदार टीका केली. ''पराभवाची चाहूल लागल्याने सध्या नारायण राणेंच्या घरी शुकशुकाट पसरला आहे. परवा नितेश राणेंबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना भाजपाच्या शाळेत दाखल करून संयमाचे धडे देणार असल्याचे सांगितले. मात्र नितेश राणेंसारखा उनाड विद्यार्थी कुठल्याही शाळेत घातला तरी सुधरणार नाही, असे संदेश पारकर म्हणाले. संदेश पारकर यांनी यावेळी नारायण राणेंवरही टीकेचे प्रहार केले.''नारायण राणे भाजपात आल्याने भाजपाला डबल इंजिनची ताकद मिळाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र नारायण राणेंचे कोळसा संपलेले बंद पडलले इंजिन घेऊन भाजपा निघाली आहे. राणेंचे राजकीय मूल्य संपले आहे. त्यामुळे राणेंचे बंद पडलेले इंजिन भाजपासाठी अपशकून ठरेल, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. आक्रमक नितेश राणेंना आमच्या शाळेत संयम शिकवू; मुख्यमंत्री नितेश राणे आपल्या वडिलांप्रमाणे आक्रमक आहेत. विधानसभेच्या सभागृहात असताना त्यांनी कोकणाचा विषय आक्रमतेने मांडला. आक्रमकता हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे आमच्याकडे आल्यानंतर नितेश राणेंच्या रूपात आक्रमक आणि अभ्यासू नेतृत्व समोर येईल. तसेच, त्यांना आमच्या शाळेत आणल्यानंतर आक्रमकतेबाबत संयम बाळगण्याचे धडे शिकवू, असे देवेंद्र फडणवीस यांनी कणकवलीमधील प्रचारसभेत म्हटले होते. संदेश पारकर, अतुल रावराणे यांची भाजपामधून हकालपट्टीकणकवली मतदारसंघात भाजपाचे अधिकृत उमेदवार असताना विरोधी उमेदवाराचा प्रचार करून पक्ष शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी भाजपाचेसंदेश पारकर, अतुल रावराणे, कणकवली तालुकाध्यक्ष संदेश पटेल आणि वैभववाडीचे सभापती लक्ष्मण रावराणे यांची भाजप पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी बुधवारी दिली .
नितेश राणेंसारखा उनाड विद्यार्थी कुठल्याही शाळेत घातला तरी सुधारणार नाही, संदेश पारकरांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 1:07 PM