मुंबई - सत्ताधाऱ्यांना जाब विचारणाऱ्या, नागरिकांचे प्रश्न सोडवणाऱ्या व समस्यांवर आवाज उठवणाऱ्या सक्षम, प्रबळ, कणखर विरोधी पक्षाची राज्याला गरज आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना विजयी करून सक्षम विरोधी पक्षासाठी संधी द्या, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वांद्रे येथे पहिल्या जाहीर सभेत केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात कधी उमेदवार आयात करण्याची वेळ आली नव्हती, असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला. राज यांच्या या भूमिकेचं राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार सुनिल तटकरेंनी स्वागत केले आहे. तसेच, राज यांचे कौतुक करताना तटकरेंनी शिवसेनेला चांगलाच टोला लगावला.
शिवाजी पार्कच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी युतीत शिवसेना सडल्याची आरोळी ठोकली होती. यावर राजीनामा देण्याची फक्त घोषणा केली, अशी टीका गोरेगावच्या सभेत करताना ‘आमची वर्षे युतीत सडली आणि 124 जागांवर अडली,’ अशी टपलीही राज यांनी मारली. ईडीच्या चौकशीमुळे माझे थोबाड बंद होणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. सत्ता आवाक्यात असेल तेव्हा सत्तेसाठी मते मागेन. मात्र, सध्या माझा आवाका मला माहीत असल्याने प्रबळ विरोधी पक्षासाठी मतदान करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ही भूमिका देशात कोणत्याही राजकीय पक्षाने घेतली नाही. मात्र आम्ही घेत आहोत. कारण विरोधी पक्षाचा आमदार सत्ताधाऱ्यांना नामोहरम करू शकतो, असे स्पष्टीकरण राज यांनी त्यांच्या भूमिकेबद्दल दिले. राज यांच्या या भूमिकेचं राष्ट्रवादीने स्वागत केलं आहे.
राज ठाकरे जमिनीवर आहेत, कारण आपले उमेदवार किती उभे राहणार, किती निवडूण येऊ शकतात हे गणित त्यांनी योग्य पद्धतीने केलंय. मला आश्चर्य वाटतं की 124 जागा लढवणारा शिवसेना पक्ष महाराष्ट्राचा मुख्यमंत्री स्वबळावर कसा काय करणार हे गणित मला समजत नाही, असे खासदार सुनिल तटकरेंनी म्हटलंय. स्वबळावर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनविण्यासाठी माझ्या थोड्याफार ज्ञानानुसार 145 जागांची गरज आहे. पण, शिवसेना 124 जागा लढूनही मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघतेय. राज ठाकरेंची भूमिका वस्तुस्थितीवर आधारित आहे. तसेच, राज यांची स्वच्छ मनाची भूमिका दिसत आहे. त्यांना सक्षम विरोधीपक्ष द्यायचा आहे, असे म्हणत तटकरेंनी राज ठाकरेंचे कौतुक करताना शिवसेनेला चांगलाच टोला लगावला.
दरम्यान, राज्यातील विधानसभा प्रचाराची राज ठाकरेंची पहिली जाहीर सभा वांद्रे पूर्व विधानसभेतील सांताक्रुझ पूर्व येथील मराठा कॉलनीमध्ये गुरुवारी आयोजित करण्यात आली होती.