नाशिक: शिवसेना, भाजपामधील संघर्ष अगदी टोकाला गेला आहे. मात्र तरीही दोन्ही पक्षांनी युती संपुष्टात आल्याची घोषणा केलेली नाही. त्यामुळेच शिवसेनेचे नेते आणि आमदार अद्यापही भाजपासोबतच्या युतीबद्दल आशावादी असल्याचं दिसत आहे. युतीचा रबर ताणला गेलाय. पण तुटलेला नाही, असं सूचक विधान शिवसेनेचे नेते आणि आमदार गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. मित्रपक्षातील नेत्यांशी आमचे आजही मैत्रीपूर्ण वैयक्तिक संबंध असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं.विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच सत्तापदांच्या वाटपावरुन शिवसेना, भाजपामध्ये वाद झाला. हा वाद अतिशय टोकाला गेल्यानंतर शिवसेना, भाजपामधील संवाद जवळपास संपला. यानंतर शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याची तयारी केली. त्यासंबंधीची बातचीतदेखील तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'मातोश्रीचा आदेश हाच शिवसैनिकांचा डीएनए आहे. युती तोडण्याचं पाऊल शिवसेना उचलणार नाही. मित्रपक्षातील नेत्यांशी आमचे आजही मैत्रीपूर्ण वैयक्तिक संबंध आहेत. हिंदुत्व हा आमचा धागा आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे अतिशय चांगले मित्र आहेत,' असं पाटील म्हणाले. विशेष म्हणजे पाटील यांनी मुंबईतील हॉटेलमध्ये वास्तव्यात असताना भाजपावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. शिवसेनेचे आमदार फोडण्याची हिंमत करुनच दाखवा, असं आव्हान त्यांनी भाजपाला दिलं होतं.काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत बोलताना युतीबद्दलचा प्रश्न टाळला होता. त्याचप्रमाणे गुलाबराव पाटील यांनीदेखील युतीच्या भविष्यावर सावध भूमिका घेतली. 'उद्धव ठाकरेंचा निर्णय आमच्यासाठी अंतिम आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना भेटायला का गेले नाहीत? ठाकरे कुटुंब वैयक्तिक संबंध जपणारं आहे. मध्यस्थांच्या माध्यमातून चर्चा होत असली, तरी निर्णय महत्वाचा,' असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.
महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाऐवजी 'मातोश्री' धरतेय काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात; पण शिवसेना नेत्यांची युतीबद्दल 'मन की बात'?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 9:09 PM