मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत संपल्यानंतर राज्यातील २८८ मतदारसंघातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले. काही अपवाद वगळता सर्वत्र तिरंगी आणि चौरंगी लढती होत आहेत. तर दुसरीकडे, बंडखोरी शमविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून जोरदार प्रयत्न झाल्यानंतरही बहुसंख्य मतदारसंघात बंडखोराचे आव्हान कायम आहे. विशेषत: दीपक केसरकर, मदन येरावार आणि संजय राठोड या राज्यमंत्र्यांविरुद्ध बंडखोरांनी शड्डू ठोकला आहे.
सोलापूर, कोल्हापूर, यवतमाळ आणि जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक बंडखोर निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत. सोलापूर शहर मध्य मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार दिलीप माने यांच्या विरोधात महेश कोठे, बार्शीत शिवसेनेच दिलीप सोपल यांच्या विरोधात भाजपचे बंडखोर राजेंद्र राऊत, करमाळ्यात शिवसेनेच्या रश्मी बागल यांच्या विरोधात सेनेचे नारायण पाटील, पंढरपूरात राष्टÑवादीचे भारत भालके यांच्या विरोधात काँग्रेसचे शिवाजी काळुंगे, मोहोळमध्ये शिवसेनेचे नागनाथ क्षीरसागर विरोधात शिवसेनेचे मनोज शेजवाल आणि सांगोला मतदारसंघात शिवसेनेचे शहाजी पाटील यांच्या विरोधात भाजपच्या बंडखोर राजश्री नागणे यांनी बंडखोरी केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसमध्ये शिवसेना उमेदवार आणि राज्यमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात भाजप संजय देशमुख, उमरखेडमध्ये भाजप उमेदवार नामदेव ससाने यांच्या विरोधात शिवसेनेचे डॉ. विश्वनाथ विणकरे तर यवतमाळ मतदारसंघात भाजपचे राज्यमंत्री मदन येरावार यांना शिवसेनेचे बंडखोर संतोष ढवळे यांनी आव्हान दिले आहे. आर्णीत भाजपचे उमेदवार डॉ. संदीप धुर्वे यांच्या विरोधात भाजपचे बंडखोर प्रा. राजू तोडसाम यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. वणी मतदारसंघात तर भाजपचे संजीवरेड्डी बोदकूरवार यांना विश्वास नांदेकर व सुनील कातकडे या दोन शिवसैनिकांनी आव्हान दिले आहे.कोल्हापूर जिल्ह्यात बंडखोरीकागलमध्ये भाजपच्या समरजित घाटगे यांनी शिवेसनेच्या संजय घाटगे यांच्या विरोधात बंडखोरी केली असून राधानगरीत शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात भाजपच्या राहुल देसाई यांची बंडखोरी कायम आहे. शिरोळमध्ये शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांच्या विरोधात भाजपच्या अनिल यादव, चंदगडमध्ये शिवसेनेचे संग्राम कुपेकर यांच्या विरोधात शिवसेनेतून अनिरुद्ध रेडेकर यांची तर भाजपमधून शिवाजी पाटील, रमेश रेडेकर आणि अशोक चराटी यांची बंडखोरी. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राजेश पाटील यांचे भाऊ महेश पाटील अपक्ष म्हणून रिंगणात. कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात भाजपचे चंद्रकांत जाधव काँग्रेसकडून रिंगणात आहेत.कणकवलीत नीतेश राणेंच्या विरोधात सेना !कणकवलीत भाजपचे उमेदवार नीतेश राणे यांच्या विरोधात शिवसेनेचे सतीश सावंत यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे त्यांनी शिवसेनेचा ए-बी फॉर्म दाखल केला आहे.याच मतदारसंघात भाजपचे बंडखोर संदेश पारकर यांनी आपला अर्ज मागे घेऊन सावंत यांना पाठिंबा दिल्याने राणे यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. तर दुसरीकडे सावंतवाडीत शिवसेनेच्या दीपक केसरकरांविरोधात भाजप बंडखोर राजन तेली यांचा अर्ज कायम राहिला आहे.