नागपूर : राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटताना दिसत आहे. अशातच काँग्रेसमध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन दोन मतप्रवाह असल्याचं समोर आलं आहे. काँग्रेसचा कुठलाही आमदार शिवसेनेसोबत जाऊ इच्छित नाही असे वक्तव्य प्रदेश कार्याध्यक्ष नितीन राऊत यांनी केले आहे. तर कुठल्याही स्थितीत भाजपला सत्तेत येऊ द्यायचे नाही असे म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सेनेला सशर्त पाठिंबा देण्यास हरकत नसल्याचे संकेत दिले.
या दोन्ही नेत्यांनी नागपुरात बुधवारी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. काँग्रेस पक्ष हा विचारधारेला पकडून चालणारा पक्ष आहे व कार्यकर्तेदेखील त्याच दिशेने काम करतात. विचारधारेशी संलग्न राहूनच आमदारांनी निवडणूक जिंकली. यात अनेक तरुण आमदारदेखील निवडून आले. यातील एकाही आमदाराला शिवसेनेसोबत जाण्याची इच्छा नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे व जो काही निर्णय होईल तो संयुक्तपणेच होईल, असे प्रतिपादन नितीन राऊत यांनी केले आहे.
तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासंदर्भात वक्तव्य केले. महाराष्ट्रासाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे आहेत. राज्यात राजकीय तिढा भाजपामुळे निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीची भूमिका जी आहे तीच आमची आहे. सेनेला पाठिंबा देण्याची भूमिका पक्षश्रेष्ठी ठरवतील. परंतु भाजपच्या हाती सत्ता येता कामा नये हेच आमच्या बहुसंख्य आमदारांचे मत स्पष्ट आहे. ते आम्ही पक्षश्रेष्ठींना कळविले आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
दरम्यान, काँग्रेस नेते हुसेन दलवाईंनी मुंबईत संजय राऊतांची भेट घेतली असून, त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत भाजपावर निशाणा साधला होता. कोणत्याही परिस्थितीत भाजपाचं सरकार अन् मुख्यमंत्री होऊ देणार नाही. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार असेल तर शरद पवार आणि सोनिया गांधींनी मिळून यावर तोडगा काढावा. भाजपापेक्षा शिवसेना केव्हाही चांगलीच आहे. देवेंद्र फडणवीस यांना भागवतांचा सल्ला घ्यावा लागतो. भाजपाचं हिंदुत्व आणि शिवसेनेच्या हिंदुत्वामध्ये बराच फरक आहे. आम्ही ईडीला घाबरत नाही, असं म्हणत त्यांनी भाजपावरही हल्लाबोल केला आहे.