अहमदनगर - संगमनेर येथील शिवसेनेचे उमेदवार साहेबराव नवले यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख यांची प्रचारसभा आज येथे झाली. या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. तसेच त्यांच्या सभास्थानी असलेल्या उपस्थितीमुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तेजस ठाकरे हे फक्त सभा पाहण्यासाठी आले आहेत.ते जंगलात रमणारे माणूस आहेत, असे स्पष्ट करत सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात संगमनेर मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार मैदानात आहे. दरम्यान, नवले यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आज संगमनेर येथे झाली. या सभेला उद्धव ठाकरे यांच्यासोबत राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील आणि अन्य नेते उपस्थित होते. तसेच उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे हेही सभेवेळी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचा घेतलेल्या निर्णयानंतर तेजस ठाकरे हे सुद्धा सक्रिय राजकारणात उतरणार का, याबाबतचे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले होते. मात्र स्वत: उद्धव ठाकरे यांनी तेजस ठाकरे हे केवळ सभा पाहण्यासाठी आले असून, ते जंगलात रमतात, असेही स्पष्ट केले.''
यावेळी उद्धव ठाकरे यांनी बाजीप्रभू देशपांडें संदर्भात केलेल्या विधानावरून बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार टीका केली, ते थोरात असतील तर आम्ही जोरात आहोत, थोरात साहेबांनी आता घरी जायला हरकत नाही, असा टोला त्यांनी लगावला. बाळासाहेब तुमचा नेता बँकॉकला पोहोचला आहे तुम्ही काळजी करू नका, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.