ठळक मुद्देयुतीच्या जागावाटपात शिवसेनेला अवघ्या 124 जागाशिवसेनेने तडजोड केली. शिवसेना झुकली, अशी राजकीय वर्तुळात चर्चा 124 जागा हा आकडा शिवसेनेच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात कमी आकडा असला तरी त्याबरोबरच शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याची सुरुवात करणारा हा पहिला आकडा असेल
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये अखेरच्या क्षणी युती झाली होती. मात्र युतीच्या जागावाटपात शिवसेनेला अवघ्या 124 जागा मिळाल्याने शिवसेनेने तडजोड केली. शिवसेना झुकली, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र 124 जागा हा शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत आतापर्यंतच्या इतिहासात लढवलेला सर्वात कमी आकडा असला तरी यावेळपासून शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार जिंकण्यास सुरुवात होईल, असा दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेली विशेष मुलाखत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये आज प्रसिद्ध झाली. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी झालेली युती, जागावाटपात शिवसेनेने घेतलेली मवाळ भूमिका, शिवसेनेचं आगामी राजकारण आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर सत्तेमध्ये मिळणारा वाटा अशा विषयांवर भाष्य केले.
यावेळी शिवसेनेने 124 जागांवर तडजोड का केली, अशी विचारणा केली असता, उद्धव ठाकरे यांनी जागावाटपात झुकती भूमिका घेतल्याचा दावा फेटाळून लावला. ते म्हणाले, ''आम्ही 124 जागांवर तडजोड केलेली नाही. आमची अडचण समजून घ्यावी असे आवाहन देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे सातत्याने करत होते. दरम्यान ही अडचण मी समजून घेतली.'' मात्र 124 जागा हा शिवसेनेने आतापर्यंतच्या इतिहासात विधानसभेला लढवलेला सर्वात कमी आकडा आहे, असा प्रतिप्रश्न उद्धव ठाकरे यांना केला असता त्यांनी सांगितले की, 124 जागा हा आकडा शिवसेनेच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात कमी आकडा असला तरी त्याबरोबरच शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याची सुरुवात करणारा हा पहिला आकडा असेल. सर्वाधिक आमदार निवडून आणण्याच्या मोहिमेची सुरुवात या आकड्यापासून होईल.'' दरम्यान, शिवसेनेचे अधिकाधिक आमदार निवडून यावेत या दृष्टीने मी प्रयत्न करत आहे. शिवसेनाप्रमुख सांगायचे की, वादळ आलं की, आपण शांत उभं राहायचं असतं. वादळामध्ये सगळे पाल्यापाचोळ्यासारखे उडून जातात. मात्र मी वादळामध्ये माशी शिवसेना वाढवून दाखवणार. इतर पक्ष उखडून फेकले जात असताना शिवसेनेची पाळेमुळे खोलवर रुजवून दाखवणार, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
...तोपर्यंत राजकारण सोडणार नाही; उद्धव ठाकरेंची प्रतिज्ञा
'अब्जाधिश' असलेला प्रकाश आंबेडकरांचा 'वंचित' उमदेवार
सर्वोच्च न्यायालयाने घेतली आरेतील वृक्षतोडीची दखल, आज सुनावणी