मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उमेदवारांशिवाय लोकसभा निवडणूक आपल्या 'ए लाव रे तो व्हिडिओ'च्या प्रचारांनी गाजवली होती. त्यानंतर, आता विधानसभा निवडणुकांसाठीही ते आपल्या उमेदवारांसह मैदानात उतरले आहेत. पहिल्या सभेत राज यांनी शिवसेनेवर जबरी टीका केली. शिवसेनेच्या 124 जागांवरील तडजोडीवरुन राज यांनी शिवसेनेला टोला लगावला होता. त्यानंतर, आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज यांचा समाचार घेतला आहे.
राज्याला एक सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे, सत्तेतला आमदार काही करु शकत नाही, विरोधी पक्षाचा आमदार प्रबळ असायला हवा. सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी, नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी व समस्यांवर आवाज उठवणाऱ्या सक्षम, प्रबळ, कणखर विरोधी पक्षाची राज्याला गरज आहे. मी सत्तेसाठी नाही तर प्रबळ विरोधी पक्षासाठी मी आलो आहे. तुमचा राग व्यक्त करण्यासाठी माणसं नसतील तर उपयोग नाही अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भूमिका मांडत विरोधी पक्षासाठी संधी द्या असं आवाहन पहिल्याच सभेत केलं. मात्र, राज ठाकरेंच्या या आवाहनानंतर भाजपाने व्यंगचित्र काढून ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका केली. तर, आता शिवसेनेनंही राज यांना उपरोधात्मक टोला लगावला.
राज ठाकरेंनी यंदा आपल्याला विरोधी पक्षात काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी केली होती. याबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, 'पुढीलवेळी ते फक्त पेपर वाचण्यापुरते निवडणुकीच्या मैदानात उतरतील', असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज यांना टोला लगावला. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी मातोश्रीवर शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध केला. त्यावेळी, पत्रकारांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी राज यांना टोला लगावला.