मुंबई - उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर हे आपल्या बेधडक शैलीमुळे परिचित आहेत. मात्र, त्यांचा हा बेधडकपणा आता त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण, विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत कार्यकर्त्यांची मने जिंकण्यासाठी ओमराजेंनी वाहतुकीचे नियमच धाब्यावर बसवले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासमवेत गाडीवर बसलेले स्थानिक नेतेही बिनधास्तपणे वागताना दिसत आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. उस्मानाबाद मतदारसंघातुन शिवसेनेकडून खा.ओमराजे निंबाळकर यांचे समर्थक कैलास पाटील हे शिवसेनेकडून उमेदवार आहेत. पाटील यांच्यासाठी ओमराजे गावोगावी जाऊन प्रचार करताना दिसत आहेत. मात्र, ओमराजे यांच्या कार्यकर्त्यांनीच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामध्ये, ओमराजे एका बुलेटवरुन ट्रिपल सीट प्रवास करताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडीओला कार्यकर्त्यांनी मोठ्या हौसेनं व्हायरल केलं. मात्र, जबाबदार नागरिकांकडून जेव्हा, वाहतुकीचे नियम हे फक्त सर्वसामान्यांसाठीच असतात का, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. त्यावेळी, कार्यकर्त्यांनी हा व्हिडीओ फेसबुकवरुन काढून टाकला आहे. मात्र, तो इतर ग्रुपमध्ये व्हायरल झाला आहे. खासदार महोदयांनीच ट्रीपल सीट प्रवास करुन वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले आहेत. त्यामुळे, अनेकांनी त्यांच्यावर काय कारवाई होणार? की नेता असल्यामुळे त्यांना सूट मिळणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.