महाराष्ट्र निवडणूक 2019: आव्हाड पाहताहेत 'त्या' फोनची वाट; पण कोणी फोनच करेना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 01:15 PM2019-11-08T13:15:45+5:302019-11-08T13:19:45+5:30
जितेंद्र आव्हाड यांचा खोचक टोला
मुंबई: शिवसेना आमदाराला तब्बल 50 कोटींची ऑफर देण्यात आल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांकडून करण्यात आला आहे. त्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खोचक टोला लगावला आहे. मी फोनची वाट बघतोय, कुणी फोन करतच नाही, असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.
निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन आठवडे झाले तरीही राज्यातील सत्ता स्थापनेची कोंडी फुटलेली नाही. जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल दिला असूनही शिवसेना, भाजपाला सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं आहे. यानंतर आता भाजपानं फोडाफोडीचं राजकारण सुरू केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. शिवसेनेच्या आमदाराला 50 कोटींची ऑफर देण्यात आल्याचा सनसनाटी दावा करत त्यांनी इगतपुरीच्या काँग्रेस आमदाराशीदेखील भाजपानं संपर्क साधल्याचं म्हटलं.
मी फोन ची वाट बघतोय
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 8, 2019
कुणी फोन करतच नाही #50कोटी
भाजपाकडून होणाऱ्या आमदारांच्या कथित फोडाफोडीवरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चिमटा काढला. 'मी फोनची वाट बघतोय, कुणी फोन करतच नाही. #50कोटी', असं ट्विट त्यांनी केलं. त्यावर आमदार फोडणं ही आमची संस्कृती नसल्याचं भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं. उपाध्येंच्या या विधानाचा आव्हाड यांनी समाचार घेतला. गोवा, मणीपूरात सर्वात मोठा पक्ष नसूनही भाजपानं सत्ता स्थापन केली. कर्नाटकमध्ये भाजपानं काय केलं, हे सगळ्या देशानं पाहिलंय. त्यामुळे भाजपानं संस्कृतीच्या गोष्टी करू नयेत, असं आव्हाड म्हणाले.