मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या व्यक्तव्याला चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरेंनी पुण्याच्या मंडईत कसबा विधानसभा मतदारसंघातील मनसेच्या उमेदवारासाठी प्रचारसभा घेतली. त्यावेळी बोलताना, भाजपा नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख चंपा म्हणून केला. तसेच, कोल्हापूरातील पाण्यातून एक मंत्री वाहून इथपर्यंत पोहोचलाय, असा उपरोधात्मक टोलाही पाटील यांनी बजावला होता.
राज ठाकरेंच्या या टीकेला उत्तर देताना चंद्रकात पाटील यांनी राज यांनाच प्रश्न विचारला. कोल्हापुरात पूर आला तेव्हा मी तिथं पाय रोवून उभा होतो. तब्बल 5 लाख लोकांचं स्थलांतर केलं. राज ठाकरे त्यावेळी कुठे होते? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. भाजपनं आज विधानसभा निवडणुकीसाठी संकल्पपत्र प्रसिद्ध केलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी राज ठाकरेंना प्रतिप्रश्न केला. तसेच, राज ठाकरे हे शरद पवार यांच्या इशाऱ्यावर काम करतात, असेही पाटील यांनी म्हटले.
दरम्यान, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती असताना सत्ताधारी निवडणुकांच्या प्रचारात मग्न होते. त्यादरम्यान काय झालं? राज्यात एवढा पूर आला की कोल्हापूरचा एक मंत्री वाहत पुण्यात आला, असं म्हणत राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे, ते पुण्यातल्या कसब्यातील सभेत बोलत होते. कोथरूड मतदारसंघातून यंदा भाजपानं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पाटील हे मूळचे कोल्हापूरचे असल्याने बाहेरचा उमेदवार कोथरूडकरांवर लादल्याची टीका करण्यात येत होती. मनसेने कोथरूडमधून किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.