मुंबई: विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे राजकीय नेत्यांचे एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप वाढू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शरद पवार यांना पाकिस्तानचा पाहुणाचार भावला. त्यामुळेच त्यांना पाकिस्तानचं कौतुक वाटतं, अशा शब्दांमध्ये मोदींनी पवारांना लक्ष्य केलं होतं. त्यांच्या या टीकेला आता शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.मी पाकिस्तानधार्जिणा वाटतो, तर मग भाजपा सरकारनं मला पद्मविभूषण पुरस्कार का दिला, असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला आहे. शरद पवारांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवल्याचा घणाघाती टीका पवार यांनी 'सीएनएन-न्यूज१८'ला दिलेल्या मुलाखतीत केली. 'पंतप्रधानपद ही एक वैधानिक पद आहे. त्यांच्याकडे खात्रीलायक माहिती मिळवण्याचे अनेक पर्याय असतात. त्यांनी योग्य माहिती घेऊन वक्तव्य केलं असतं, तर ते मला आवडलं असतं. पण पंतप्रधानच कोणतीही माहिती न घेता बेछूट विधानं करत असतील, तर त्यावर काय बोलावं?,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मला पाकिस्तानात जास्त रस आहे. त्या देशात माझे हितसंबंध आहेत. मी देशविरोधी आहे असं मोदींना वाटत असेल, तर मग त्यांच्या सरकारनं मला पद्मविभूषण पुरस्कार का दिला, असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला. पद्मविभूषण पुरस्कार खूप मोठा आहे. तो देशातला दुसऱ्या क्रमाकांचा नागरी पुरस्कार आहे. भाजपा सरकार जर इतका मोठा पुरस्कार मला देत असेल, तर मी देशाची काहीतरी महत्त्वपूर्ण सेवा केली असा त्याचा अर्थ होतो. एका बाजूला पुरस्कार द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला असे आरोप करायचे, हा दुटप्पीपणा कशासाठी?, असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला. देशातील सर्वाच्च पदावर बसलेली व्यक्ती इतकी दुटप्पी आहे, अशी खरमरीत टीकादेखील पवारांनी केली.
मला पाकिस्तानधार्जिणा म्हणता, मग पद्मविभूषण का दिलात?; शरद पवारांचा मोदींना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 12:49 PM