Maharashtra Election 2019: 'चंद्राच्या गोष्टी करणारे मोदी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल गप्प का?'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 07:22 PM2019-10-13T19:22:42+5:302019-10-13T19:24:11+5:30
राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल
मुंबई: शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत. बँकांचे घोटाळे समोर येत आहेत. मात्र असं असूनही पंतप्रधान मोदी चंद्राच्या गोष्टी करतात. चंद्राच्या गोष्टी करणारे मोदी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल गप्प का?, असा सवाल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी, जीएसटी, नोटबंदीवरुन राहुल यांनी चांदिवतील प्रचारसभेत मोदींना लक्ष्य केलं. काँग्रेस नेते नसीम खान यांच्यासाठी राहुल चांदिवलीत आले होते.
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लोकांना खूप आश्वासनं दिली होती. मात्र आज सर्वसामान्य जनतेची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचं राहुल गांधी म्हणाले. 'मोदी सरकारनं गब्बर सिंग टॅक्स लावून जनतेचं कंबरडं मोडलं. काळा पैसा नष्ट करायचा असल्याचं सांगून मोदींनी नोटबंदी केली. नोटा बदलण्यासाठी मुंबईकर रांगेत उभे होते. मात्र ज्यांच्याकडे काळा पैसा होता, ते थेट देशाबाहेर पळून गेले. आज लहान उद्योग बंद होत आहेत. धारावीतील उद्योग संकटात. याला सर्वस्वी मोदी जबाबदार आहेत,' अशा शब्दांमध्ये राहुल यांनी मोदींवर कडाडून टीका केली.
मोदी चंद्राच्या गोष्टी करतात. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर काहीच बोलत नाही. बँक घोटाळे होतात. मात्र त्यावरही भाष्य करत नाहीत. लोकांचं लक्ष विचलित करण्याचं काम भाजपा सरकारकडून सुरू आहे. देशातल्या युवा पिढीला भविष्य दिसत नाही. मात्र मोदी देश फिरण्यात व्यस्त आहेत, अशी टीका त्यांनी केली. 'जीएसटीमुळे कोणाचा फायदा झाला? कोणाचाच नाही. सरकार खरं बोलत नाही. आधी जगात देशाला मान होता. आज मात्र देशात गुंतवणूक येत नाही. व्यवसायिक देश सोडून जात आहेत. भाजप देशाला विभागण्याचे काम करत आहे, अशा शब्दांमध्ये राहुल गांधी प्रचारसभेत मोदी सरकारवर बरसले.