मुंबई: येणाऱ्या काही दिवसात योग्य निर्णय घेऊन भाजपा राज्याला स्थिर सरकार देईल, असा विश्वास भाजपाचे नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. सत्ता स्थापन करण्यासाठी आम्ही पावलं उचलू. कोअर कमिटीत त्यावर विस्तृत चर्चा झाली आहे. या संदर्भातल्या घटनात्मक तरतुदींशी चर्चा करण्यासाठी आज राज्यपालांची भेट घेणार आहोत. सत्तास्थापनेचा दावा करायचा की करायचा नाही, याचा निर्णय राज्यपालांच्या निर्णयानंतर घेऊ, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं. शिवसेनेसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी पत्रकारांना दिली. शिवसेनेकडून काही स्तरावर चर्चा आहे. पण चॅनलच्या माध्यमातून पाहिलं तर वाटतं चर्चा बंद आहे, असं सूचक विधान त्यांनी केलं. शिवसेनेसोबतच सरकार स्थापन व्हावं ही भाजपाची इच्छा आहे. अल्पमतातील सरकार कदापि बसवणार नाही. दिल्लीहून तशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. स्थिर सरकार देण्याच्या दृष्टीनंच भाजपानं आत्तापर्यंत वाट पाहिली आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.
महाराष्ट्र निवडणूक 2019: 'दिल्लीहून स्पष्ट सूचना आल्यात; 'तसं' पाऊल कदापि उचलणार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 12:15 PM