मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना, भाजपामध्ये बऱ्याच दिवसांपासून चर्चेचं गुऱ्हाळ सुरू होतं. शिवसेना निम्म्या जागांसाठी आग्रही होती. मात्र अखेर शिवसेनेला १२४ जागांवर समाधान मानावं लागलं. याशिवाय आणखी एका अर्थानं यंदाची निवडणूक शिवसेनेसाठी महत्त्वाची आहे. इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकीच्या आखाड्यात ठाकरे घराण्यातील व्यक्ती उतरली आहे. आदित्य यांना मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेना कामाला लागली आहे. विधानसभा निवडणुकीतील याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'ला मुलाखत दिली आहे.शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही, तोपर्यंत राजकारण सोडणार नसल्याचं उद्धव यांनी मुलाखतीत म्हटलं आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करत नाही, तोपर्यंत राजकारण सोडणार नाही, असं वचन मी बाळासाहेबांना दिलं आहे. शिवसेनाप्रमुखांना दिलेलं वचन मी जोपर्यंत पूर्ण करत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार उद्धव यांनी व्यक्त केला. भाजपा हे ऐकलं का, या प्रश्नाला त्यांनी माझं वचन आहे. ते मी पूर्ण करणार, असं उत्तर त्यांनी दिलं.भाजपाकडून सातत्यानं उपमुख्यमंत्रीपद देऊ, असं निवेदन देण्यात येत असल्याची आठवण संजय राऊत यांनी करुन दिली. त्यावर बाळासाहेबांना वचन देण्यासाठी मला कोणाच्याही परवानगीची गरज नसल्याचं उद्धव म्हणाले. कोणी ऐको न ऐको. हे वचन मी कोणाला विचारुन दिलेलं नाही. हे वचन मी माझं सर्वस्व, अर्थात माझे गुरू, माझे पिता, माझा नेता.. जे काही मी मानतो त्यांना दिलेलं हे वचन आहे आणि ते मी कोणाच्या परवानगीनं दिलेलं नाही. कुणाच्याही परवानगीवाचून ते अडणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
Maharashtra Election 2019: ...तोपर्यंत राजकारण सोडणार नाही; उद्धव ठाकरेंची प्रतिज्ञा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 9:06 AM