Heena Gavit Aamshya Padavi News: महायुतीमध्ये आणखी एका मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटलेल्या अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात माजी खासदार हिना गावित यांनी बंडखोरी केली आहे. शिंदेंनी या मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात आता गावितांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीला अनेक ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. अनेक इच्छुकांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले असून, नंदूरबारच्या भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनीही आता महायुतीच्याच उमेदवाराविरोधात बंड केले आहे.
हिना गावितांनी भरले दोन अर्ज
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून हिना गावित यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एक अर्ज भाजपच्या उमेदवार म्हणून, तर दुसरा अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी दाखल केला आहे. त्यामुळे हिना गावितांनी माघार न घेतल्यास महायुतीला मतविभाजनाचा फटका बसू शकतो.
शिंदेंकडून आमश्या पाडवी मैदानात
महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अक्कलकुवाची जागा सुटली आहे. शिंदेंकडून विधान परिषदेतील आमदार आमश्या पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. पण, हिना गावितांमुळे या मतदारसंघात ट्विट आला आहे. 'शिंदेंच्या शिवसेनेकडून जो उमेदवार देण्यात आला आहे, ते आमदार आहेत. त्यामुळे ही जागा भाजपला देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी अर्ज भरल्यानंतर केली आहे.
लोकसभा निवडणुकीत पराभव
हिना गावित या दोन वेळा नंदूरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार होत्या. २०२४ मध्ये त्यांचा पराभव झाला. काँग्रेसचे गोवाल पाडवी यांनी हिना गावित यांचा पराभव केला होता. गोवाल पाडवी यांना ७,४५,९९८ मते मिळाली होती. तर हिना गावित यांना ५,८६,८७८ मते मिळाली होती. पाडवी यांनी १ लाख ५९ हजार १२० इतक्या मतांनी हिना गावितांचा पराभव केला होता.