Maharashtra Vidhan Sabha 2024 BJP: हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने अनेक मंत्री आणि आमदारांचा पत्ता कट केला. नवे चेहरे दिले. त्यामुळे महाराष्ट्रातही अनेक विद्यमान आमदारांची धाकधूक वाढली होती. पण, भाजपने मोजक्याच मतदारसंघात विद्यमान आमदारांना बाजूला करत नवे उमेदवार दिले आहेत. आठ विधानसभा मतदारसंघात भाजपने उमेदवार बदलले आहेत.
भाजपने कोणत्या आमदारांची कापली तिकिटं?
भाजपने मुंबईला लागून असलेल्या बोरिवली विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुनील राणे यांचे तिकीट कापले. त्यांच्या ऐवजी संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली.
आर्णी विधानसभा मतदारसंघातही भाजपने उमेदवार बदलला. विद्यमान आमदार संदीप धुर्वे यांच्याऐवजी राजू तोडसम यांनी उमेदवारी दिली आहे.
उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नामदेव सासने यांनाही भाजपने धक्का दिला. सासने यांचे तिकीट कापत किसन वानखेडे यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
आर्वी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दादाराव केचे यांनाही भाजपने पुन्हा संधी दिली नाही. त्यांच्याऐवजी भाजपने सुमित वानखेडे यांना मैदानात उतरवले आहे.
नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात उमेदवार बदलला
नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातही भाजपने उमेदवार बदलला आहे. विद्यमान आमदार विकास कुंभारे यांचे तिकीट कापत भाजपने प्रवीण दटके यांना उमेदवारी दिली आहे. प्रवीण दटके हे विधान परिषदेचे आमदार आहेत, पण त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर भाजपने या मतदारसंघात शंकर जगताप यांना उमेदवारी दिली. लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे जागा रिक्त झाली होती. पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप या विजयी झाल्या होत्या.
गणपत गायकवाड यांच्या पत्नीला उमेदवारी
कल्याण पूर्वमध्येही भाजपने अशाच पद्धतीने उमेदवार बदलला आहे. पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याच्या प्रकरणात आरोपी असलेले विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वाशिम विधानसभा मतदारसंघातही भाजपने विद्यमान आमदार लखन मलिक यांना उमेदवारी न देता श्याम खोडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.