मुंबई - माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे प्रदेश भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतील. या निवडणुकीसाठी विविध समित्या पक्षाने स्थापन केल्या असून त्यांचे अध्यक्षपद ज्येष्ठ नेत्यांना देण्यात आले आहे.
दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, बूथपर्यंतची यंत्रणा सक्षम करण्यासाठी पक्षातर्फे ही व्यवस्थापन समिती तयार करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीचे नियोजन, संचलन करण्यासाठी प्रदेश, जिल्हा, तालुकास्तरावर अधिवेशने झाली.
विविध समित्यांचे प्रमुख असे - जाहीरनामा समिती - सुधीर मुनगंटीवार, विशेष संपर्क – चंद्रकांत पाटील, सामाजिक संपर्क - पंकजा मुंडे, महिला संपर्क - विजया रहाटकर, कृषिक्षेत्र संपर्क - खा. अशोक चव्हाण, लाभार्थी संपर्क - राधाकृष्ण विखे-पाटील, युवा संपर्क - रक्षा खडसे, प्रचार यंत्रणा – रवींद्र चव्हाण, सहकार क्षेत्र संपर्क - प्रवीण दरेकर, माध्यमे - आ. अतुल भातखळकर, ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था संपर्क -मुरलीधर मोहोळ, अनुसूचित जाती संपर्क - भाई गिरकर, अनुसूचित जमाती संपर्क - डॉ. विजयकुमार गावित, समाजमाध्यम- आ. निरंजन डावखरे, निवडणूक आयोग संपर्क- किरीट सोमय्या. महायुती निवडणूक अभियान समन्वयक - गिरीश महाजन.
विशेष आमंत्रित म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, माजी मंत्री गणेश नाईक, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर हे पदसिद्ध सदस्य म्हणून प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, विक्रांत पाटील, माधवी नाईक, विजय चौधरी आणि संजय केनेकर काम पाहणार आहेत.
अपमानास्पद वागणूक, किरीट सोमय्या संतापले
माजी खासदार किरीट सोमय्या यांची विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक आयोग संपर्कप्रमुख म्हणून रावसाहेब दानवे यांनी नियुक्ती जाहीर केली पण काही तासातच सोमय्या यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला. दानवे यांनी नावे जाहीर केल्याच्या काही तासांतच सोमय्या यांनी त्यांना एक खरमरीत पत्र लिहिले. आपण आणि प्रदेशाध्यक्षांनी पुन्हा अशी अपमानास्पद वागणूक मला देऊ नये, असे त्यांनी सुनावले.