मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा रविवार सर्वच उमेदवारांनी गाजवला. त्यामुळे दिवसा मतदारसंघांमध्ये प्रचार फेऱ्यांचा धूमधडाका आणि संध्याकाळी कार्यकर्त्यांद्वारे मतदारांच्या घरोघरी जाऊन वैयक्तिक प्रचार, असे चित्र सुटीच्या दिवशी पाहायला मिळाले. सुटीचा दिवस असल्याने जास्तीत जास्त मतदारांचे आपल्याकडे ‘लक्ष’ वेधण्यात उमेदवारांना यश आल्याचेही यावेळी पाहायला मिळाले.
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवारांनी सर्व प्रकारच्या प्रचारावर लक्ष केंद्रित केले आहे. रविवारी सकाळपासून मतदारसंघातील विविध वॉर्डमध्ये उमेदवारांच्या प्रचार फेऱ्यांचा जल्लोष सुरू होता. या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याने मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना या फेऱ्यांमध्ये सामील करून घेण्यात आले होते. यामध्ये काही उमेदवार प्रचार फेरीसोबतच चाळी आणि झोपडपट्ट्यांच्या गल्ल्यांमध्ये फिरून मतदारांशी थेट संपर्क साधताना दिसले. तर काही गृहसंकुलांच्या चौकामध्ये आणि मैदानामध्ये उभे राहून इमारतींमधील सर्व रहिवाशांना मतदानाचे आवाहन करत होते. दुसऱ्या बाजूला दिवसभर प्रचार रथांच्या माध्यमातून ध्वनी चित्रफितींद्वारे मतदानाचे आवाहनही उमेदवारांकडून करण्यात आले.
दरम्यान, एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने मतदारसंघातील समविचारी मतदारांना आम्ही यापूर्वीच भेटलो असून, अखेरच्या दोन दिवसांत सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
समाजनिहाय प्रचारावर भर
प्रत्येक उमेदवारांकडून मतदारसंघांमध्ये मराठी भाषिक, उत्तर भारतीय, अल्पसंख्याक तसेच अनुसूचित जाती-जमातीच्या मतदारांना हेरून त्या-त्या समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी विविध विकासकामांसोबतच मंदिर आणि समाज मंदिरांच्या उभारणीचे आश्वासनही देण्यात येत आहे.
कार्यकर्त्यांची लगबग कोणत्याही परिस्थितीत मतदारांनी घराबाहेर पडावे आणि आपल्यालाच मतदान करावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, अशा सूचना राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी आपआपल्या बुथप्रमुखांना दिल्या आहेत. त्यानुसार हे कार्यकर्ते रविवारी दिवसा प्रचार फेरीत आणि संध्याकाळी मात्र आपापल्या बूथमधील मतदारांशी घरोघरी जाऊन थेट संपर्क साधताना दिसत होेते. मतदान किती महत्त्वाचे आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.