नागपूर - ऐन विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या आणि पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख प्रा.शिल्पा बोडखे यांनी पदांचा राजीनामा दिला आहे. आठ महिन्यांपूर्वीच शिल्पा बोडखे यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप करत उद्धवसेनेतून बाहेर पडत शिंदेसेनेत पक्षप्रवेश केला होता. महायुतीतील वाचाळवीरांना कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचं कारण बोडखे यांनी सांगितले आहे. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा पत्र सोपवलं आहे.
शिल्पा बोडखे यांनी राजीनामा पत्रात म्हटलंय की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात भरपूर विकासात्मक काम करत आहेत. परंतु महायुती सरकार चालवताना तिन्ही पक्ष हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत आहोत. मात्र आपल्या सोबत असलेल्या पक्षातील काही वाचाळवीर वाट्टेल त्या भाषेत दुसऱ्यावर टीका करतात, कधी कधी धार्मिक तेढ निर्माण होईल, कोणाच्या भावना दुखावेल याचादेखील विचार करत नाहीत. खरेच आपल्याला शिकवलेल्या हिंदुत्वात दुसऱ्याचा द्वेष करायला शिकवले जाते का असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
तसेच मीदेखील हिंदु आहे परंतु माझ्यावर झालेल्या संस्कारात प्रत्येकाचा आदर करणे, प्रत्येक समाजाचा सन्मान राखणे तसेच राजकारणात मतभेद असावे पण मनभेद असू नये असं शिकवले आहे. हीच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, कित्येक दिवसांपासून असल्या वाचाळवीर नेत्याच्या वक्तव्याची चीड येते, त्यांच्या वक्तव्यामुळे तुम्ही केलेल्या कामाला कुठे तरी तडा जात आहे. वाचाळवीरांना आवर घालण्यापेक्षा त्यांचे नेते जलेबी सारखे घुमवत त्यांचे वक्तव्यांचे समर्थन करताना दिसतात. त्यामुळे अशा वातावरणात मला काम करण्याची मनापासून इच्छा होत नाही. त्यामुळे मी आपल्या शिवसेना प्रवक्ता आणि पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुखपदाचा राजीनामा देत आहे असं शिल्पा बोडखे यांनी त्यांच्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.
ठाकरे गटावर काय केले होते आरोप?
शिंदेसेनेत प्रवेश करताना शिल्पा बोडखे यांनी ठाकरे गटावर आरोप केले होते, त्या म्हणाल्या होत्या की, उबाठा गटामध्ये महिला नेतृत्व उभे राहत असेल तर त्यांच्यावर आरोप लावणे, त्यांचे खच्चीकरण करणे. हा त्रास अडीच महिन्यांपासून दिला जात होता. विदर्भात वसुली गँग बसली आहे. जी महिला त्यांना पैसे कमावून देते तिला पक्षात उभं करायचं. जी प्रामाणिकपणे काम करते तिला त्रास द्यायचा. मला असाच त्रास दिला. पक्षप्रमुखांना मी सगळं सांगितलं पण त्यांनी मला न्याय दिला नाही. बाळासाहेबांची शिवसेना तिथे राहिली नाही. कुणीही आमची दखल घ्यायला आणि विचारायलाही तयार नव्हते. वारंवार अपमान सहन करत आपला आत्मसन्मान व स्वाभिमान आपल्याच पायदळी तुडवायचा का..??. उबाठामध्ये नेतृत्वाच्या आत्मसन्मानाला किंमत पण पदाधिका-यांचे आत्मसन्मान व स्वाभिमानाला काहीच महत्व नाही का..?? असा परखड सवाल उपस्थित करत शिल्पा बोडखे यांनी ठाकरे गटावर आरोप केले होते.