Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 07:03 AM2024-11-17T07:03:27+5:302024-11-17T07:04:47+5:30

Maharashtra Vidhan Sabha 2024: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी चंद्रपूरच्या चिमूर व अमरावतीच्या धामणगाव रेल्वे येथे जाहीर सभा घेतील.

Maharashtra Election 2024: Congress and BJP leaders camp in Vidarbha for 'Super Sunday' | Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ

Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ

नागपूर : निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी विदर्भावर फोकस केला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते विदर्भात दाखल होऊन प्रचारात जोश भरत आहेत.
 
एकेकाळी काँग्रेसचा गड असलेला विदर्भ पुन्हा काबीज करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी विशेष रणनीती आखली आहे. विधानसभा निवडणुकीत विदर्भावर लक्ष केंद्रित केले तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो, हे ध्यानात ठेवूनच शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’ मारण्यासाठी काँग्रेस नेत्यांची फौज विदर्भात उतरली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे हे रविवारी उत्तर नागपुरात जाहीर सभा घेणार आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी चंद्रपूरच्या चिमूर व अमरावतीच्या धामणगाव रेल्वे येथे जाहीर सभा घेतील. काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी रविवारी विदर्भात येत आहेत. गडचिरोलीच्या वडसा येथे जाहीर सभा घेऊन पश्चिम नागपूर येथे आयोजित ‘रोड शो’मध्ये सहभागी होणार आहेत. 

संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, विदर्भाचे वरिष्ठ निरीक्षक मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, महासचिव अविनाश पांडे हे सर्व नेते नागपुरात दाखल झाली. हरयाणाच्या काँग्रेस आमदार विनेश फोगाट यांनीही नागपुरात सभा घेतली. 

बंडखोरांशी ज्येष्ठ नेत्यांचा संपर्क 

ज्येष्ठ नेते पुन्हा एकदा बंडखोरांशी संपर्क साधत असून त्यांची समजूत काढत आहेत. आजवर काँग्रेसनिष्ठा जपली, आताही वेळ गेलेली नाही, उमेदवारी मागे घेऊन काँग्रेसला समर्थन जाहीर करण्याचा आग्रह धरून भविष्यात काँग्रेस तुम्हाला न्याय देईल, असा विश्वास ज्येष्ठ नेते देत आहेत.

भाजपचाही विदर्भावर ‘फोकस’ 

विधानसभा निवडणुकीच्या मतदाना अगोदरचा शेवटच्या रविवारी विदर्भात प्रचारसभांचा धुरळा उडणार आहे. भाजप व महायुतीकडून प्रचाराच्या ‘सुपर संडे’त विदर्भावर विशेष ‘फोकस’ करण्यात आला आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मोठे नेते व पदाधिकाऱ्यांच्या सभा व दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

अमित शहा यांची रविवारी नागपूर जिल्ह्यातील काटोल व सावनेर मतदारसंघांत दुपारी सभा होणार आहे. तत्पूर्वी गडचिरोली व वर्धा येथेदेखील त्यांच्या सभा होतील. 

रविवारी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हेदेखील प्रचारासाठी नागपुरात येणार आहेत. यावेळी ते राजस्थानी नागरिक संमेलनात सहभागी होतील. तसेच नागपूर पश्चिम मतदारसंघात त्यांची जाहीर सभा होणार आहे.
 
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची दुपारी बल्लारपूर येथे जाहीर सभा होणार आहे. तर नागपूर पश्चिममध्ये कंगना राणाैत यांचा ‘रोड शो’ होईल. 

Web Title: Maharashtra Election 2024: Congress and BJP leaders camp in Vidarbha for 'Super Sunday'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.