आणखी एका काँग्रेस आमदाराची पक्षातून हकालपट्टी; पक्षविरोधी कामे केल्याचा ठपका 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 02:52 PM2024-10-15T14:52:38+5:302024-10-15T14:53:43+5:30

मागील विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप काही काँग्रेस आमदारांवर होत होता. या आमदारांमुळे महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झाला होता. 

Maharashtra Election 2024- Congress MLA Hiraman Khoskar expelled from the party; Accused of doing anti-party activities | आणखी एका काँग्रेस आमदाराची पक्षातून हकालपट्टी; पक्षविरोधी कामे केल्याचा ठपका 

आणखी एका काँग्रेस आमदाराची पक्षातून हकालपट्टी; पक्षविरोधी कामे केल्याचा ठपका 

मुंबई  - ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून नाशिक जिल्ह्यातील एका आमदारावर पक्षाविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर सतत पक्षविरोधी काम केल्याप्रकरणी इगतपुरीचेकाँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांना पक्षातून निलंबित केले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून खोसकरांच्या निलंबनाचं पत्र देण्यात आलं आहे.

प्रदेश काँग्रेस कमिटीनं पाठवलेल्या पत्रात म्हटलंय की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि त्यानंतरही आपण सतत पक्षविरोधी काम केल्याची तक्रार प्रदेश कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशावरून आपणास काँग्रेस पक्षातून पुढील ६ वर्षाकरता निलंबित करण्यात आले आहे असं पत्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या सहीने आमदार हिरामण खोसकर यांना देण्यात आले आहे. त्याबाबत नाशिक ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष शिरिष कोतवाल यांनाही कळवण्यात आले आहे.

अलीकडेच हिरामण खोसकरांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. महायुतीच्या उमेदवारांना मतदान केलेल्या आमदारांमध्ये हिरामण खोसकर यांच्या नावाचीही चर्चा झाली. अशा आमदारांवर कारवाई न करता काँग्रेसने त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता काँग्रेसकडून आता खोसकरांवर कारवाई करण्यात आली आहे.

काय म्हणाले होते हिरामण खोसकर?

इगतपुरी मतदारसंघातून मी काँग्रेसकडे उमेदवारी मागतोय. मी वारंवार जातोय. पण, काँग्रेसवाले अजूनही माझी उमेदवारी जाहीर करत नाहीयेत किंवा मला शब्द देत नाहीयेत. म्हणून साहेबांना (शरद पवार) विनंती करायला आलोय की, मागे जे काही क्रॉस व्होटिंग झालं, ते मी केलं नाही. तरी पण माझ्यावर ठपका ठेवला आहे. मी शंभर टक्के मिलिंद नार्वेकरांना मतदान केलं आहे. तेच साहेबांना (शरद पवार) सांगायला आलोय की, मला काँग्रेसकडून उमेदवारी द्या असं त्यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर सांगितले होते. 

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केलेल्या आमदारांची नावे काँग्रेसकडून जाहीर केली गेली नाहीत. मात्र, राजकीय वर्तुळात ज्या नावांची चर्चा होती त्यात झिशान सिद्दीकी, जितेश अंतापूरकर, सुलभा खोडके यांच्यासह काही जण होते. यातील जितेश अंतापूरकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. झिशान सिद्दीकी आणि सुलभा खोडके हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितले जात आहे. हिरामण खोसकरही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा होती. याआधी काँग्रेसनं २ आमदारांची हकालपट्टी केली होती. 
 

Web Title: Maharashtra Election 2024- Congress MLA Hiraman Khoskar expelled from the party; Accused of doing anti-party activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.