मुंबई - महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा जवळपास सुटला आहे. लवकरच मविआचं जागावाटप जाहीर होईल. या जागावाटपात काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार आहे. काँग्रेस १०५-११०, शिवसेना ठाकरे ९०-९५ तर शरद पवारांची राष्ट्रवादी ७५-८० जागा लढवण्याची शक्यता आहे. २०१९ च्या निकालानंतर राज्यातील राजकारण बदललं. याआधी प्रमुख ४ पक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते, तेव्हा युती आणि आघाडीत प्रत्येक पक्ष १०० पेक्षा जास्त जागा लढवत होता. मात्र पहिल्यांदाच शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला १०० पेक्षा कमी जागांवर लढावं लागत असल्याचं चित्र दिसून येते.
विदर्भातील काही जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात टोकाचा वाद होता. हा वाद दिल्ली हायकमांडजवळही पोहचला. हरियाणा निकालानंतर धडा घेतलेल्या काँग्रेसनं महाराष्ट्रात चूक नको, यासाठी लवकरात लवकर हा वाद मिटवण्याचे नेत्यांना आदेश दिले. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांना मविआतील समन्वयासाठी जबाबदारी देण्यात आली. बाळासाहेब थोरात यांनी आज शरद पवारांची भेट घेतली त्यानंतर उद्धव ठाकरेंच्याही भेटीला पोहचले. मविआची दुपारपासून जागावाटपावर बैठक सुरू आहे. त्यात जागावाटपाचा तिढा सुटल्याचं कळतंय.
२०१९ नंतर बदललं राज्यातलं राजकारण
गेल्या २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा महायुतीला जनतेनं कौल दिला होता. मात्र मुख्यमंत्रिपदावरून या दोन्ही पक्षात बिनसलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणलं. त्यानंतर अडीच वर्षांनी पुन्हा राजकीय भूकंप झाला. त्यात शिवसेना-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फुटले. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या भूमिकेमुळे शिवसेना-राष्ट्रवादीचे २ गट तयार झालेत. त्यात एक गट भाजपासोबत महायुतीत तर दुसरा काँग्रेससोबत महाविकास आघाडीत आहे. यंदाची लढाई महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगणार आहे.
४ महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. मिशन ४५ चं स्वप्न पाहणाऱ्या महायुतीला राज्यात केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेसनं सर्वाधिक १३ जागा जिंकल्या, त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ९ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ८ जागा जिंकता आल्या. आता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी ताकदीनं महायुतीविरोधात मैदानात उतरली आहे. त्यामुळे २३ नोव्हेंबरच्या निकालात कोण बाजी मारते हे येणारा काळ ठरवेल.