मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची सातत्याने बैठक सुरू आहे. मुंबईच्या सोफिटेल हॉटेलला सुरू असलेल्या मविआ नेत्यांच्या बैठकीत आतापर्यंत २६० जागांचा तिढा सुटलेला आहे. उर्वरित २८ जागांवर तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मविआचं जागावाटप आजच फायनल करून १-२ दिवसांत उमेदवारांची यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आजच्या बैठकीपूर्वी मविआत २०० जागांवर एकमत झालं होते, विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यामुळे तिन्ही पक्षातील जागावाटप लवकर सुटावे यासाठी सकाळपासून मविआ नेते बैठकीला बसले आहेत. या बैठकीत संजय राऊत, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, सतेज पाटील आणि इतर नेते उपस्थित आहेत. त्यात आतापर्यंत २६० जागांवर एकमत झाल्याचं सांगण्यात आले आहे.
महाविकास आघाडीतकाँग्रेस सर्वाधिक जागा लढण्याची शक्यता आहे. त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जागा दिल्या जातील. जागावाटपात काही जागांची अदलाबदल केली गेली आहे. त्यात मुंबईतील वांद्रे पूर्व मतदारसंघ जिथे मागील निवडणुकीत काँग्रेसचा आमदार निवडून आला होता ही जागा आता काँग्रेसकडून ठाकरे गटाला सोडण्यात आली आहे. भाजपाला आणि महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढायचे असा चंग मविआने घेतला आहे. त्यामुळे जागावाटपात तिन्ही पक्षांनी काही जागांवर सामंजस्याची भूमिका घेतली आहे.
मुंबईतील ३३ जागांवर एकमत
आजच्या बैठकीत मुंबईतील ३६ पैकी ३३ जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे. त्यात काँग्रेस १५, ठाकरेसेना १८ आणि राष्ट्रवादी २ आणि समाजवादी पार्टीला १ जागा देण्यावर सहमती झाली आहे. त्याशिवाय कुर्ला, भायखळा आणि अणुशक्तीनगर या जागांवर अद्याप पेच आहे. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर होऊ शकते असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते. काँग्रेसची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी २० ऑक्टोबरला येणार आहे. ८४ जागांबाबत उमेदवारी निश्चित झाली असून २० तारखेला पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. त्याचदिवशी उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते.