जागा वाटपावरून महायुतीत धुसफूस, नेत्यांच्या आदेशाचे उल्लंघन; नेमकं काय चाललंय?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 07:00 AM2024-09-08T07:00:35+5:302024-09-08T07:01:17+5:30
जागावाटपाचे दावे-प्रतिदावे जाहीरपणे करणे योग्य नाही, तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसून ठरवतील, अशी प्रतिक्रिया यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली
मुंबई - विधानसभेच्या जागावाटपावरून महायुतीतील तीन प्रमुख नेते सोडून कोणीही बोलू नये, असे वारंवार सांगितले जात असतानाही तिन्ही पक्षांकडून या आदेशाचे उल्लंघन करणे सुरूच आहे. जागावाटपावरून दावे करणे महायुतीतील नेते थांबवत नसल्याचे चित्र शनिवारी पुन्हा समोर आले.
बुलढाण्याचे शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमचा पक्ष १२० जागा मागेल आणि शंभर निवडून आणेल, असे विधान केले. आमच्या पक्षाला इकडे-तिकडे पाहण्याची गरज नाही, आमचे नेते एकनाथ शिंदे पक्षाला मोठे यश मिळवून देतील, असे ते म्हणाले. त्यावर, गायकवाड यांचा विश्वास योग्यच आहे; पण जागावाटपाबाबत कोणीही बोलू नये, आम्हाला कोणालाही तो अधिकार नाही. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार काय तो फॉर्म्युला ठरवतील, अशी प्रतिक्रिया शिंदेसेनेचे आ. संजय शिरसाट यांनी दिली. त्यावर, शिंदेसेनेचे काय ते तीनशेही जागा निवडून आणतील, पैशाच्या बळावर आम्ही काहीही करू शकतो, असे त्यांना वाटते, असा चिमटा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काढला.
शिंदेसेना आणि पवार गटाचे नेते आघाडीवर
दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आमच्या पक्षाला ८० ते ८५ जागा मिळायला हव्यात, असे विधान केले. काँग्रेस, अपक्षांसह ६० आमदार आजच आमच्याकडे आहेत, आणखी वीस-पंचवीस तरी जागा आम्हाला मिळायला हव्यात. भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी महायुतीतील मित्रपक्षांवर अन्याय होणार नाही, असा शब्द दिला आहे, असे भुजबळ म्हणाले.
जागावाटपाचे दावे-प्रतिदावे जाहीरपणे करणे योग्य नाही, तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसून ठरवतील, अशी प्रतिक्रिया यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. महायुतीमध्ये जिथे जो पक्ष निवडून येईल त्याला ती जागा द्यायची असे आमचे ठरले आहे. कोणताही वाद नाही, लवकरच फॉर्मुला ठरेल असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.