Eknath Shinde : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला. हा निकाल लागून दोन दिवस झाले आहेत, पण अद्याप मुख्यमंत्रीपदचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे नवीन सरकारचा शपथविधी सोहळाही लांबणीवर पडला आहे. दरम्यान, उद्या(26 नोव्हेंबर 2024) महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्या आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. पण, त्यानंतर ते काही काळ राज्याचे हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या राज्यपालांकडे राजीनामा सोपवणार आहेत. त्यानंतर ते नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधीपर्यंत हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत अजून राज्यात सस्पेंस कायम आहे, त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्याची शिवसेनेतून मागणी होत आहे, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजप आमदार आग्रही आहेत. आता याबाबतचा अंतिम निर्णय दिल्लीत होणार आहे. यासाठी देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. तिथे अमित शाहांसोबत होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय होईल.
महायुतीचा सर्वात मोठा विजयशनिवारी, 23 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. यात महायुतीने 235+ जागा जिंकून महाराष्ट्राची सत्ता काबीज केली. 288 पैकी 132 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 41 जागा मिळवल्या. या निवडणुकीत विरोधकांना मोठा फटका बसला. काँग्रेस 16, शिवसेना 20 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 10 जागा मिळाल्या. काँग्रेस-राष्ट्रवादीची ही आतापर्यंतची सर्वात खराब कामगिरी ठरली आहे.