भंडारा - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. मात्र या पक्षप्रवेशामुळे पक्षातील निष्ठावंत नाराज झाल्याचे चित्र दिसून येते. इंदापूरात हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशानंतर तिथल्या स्थानिक नेत्यांनी मोठा विरोध केला. आता इंदापूरसारखीच स्थिती भंडारा जिल्ह्यात निर्माण झाली आहे. याठिकाणी शरद पवार गटात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. माजी आमदार चरण वाघमारे यानी २ दिवसांपूर्वी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला, तेव्हापासून स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध दर्शवला आहे. हे पदाधिकारी सामूहिक राजीनामे देण्याची तयारीही करत आहेत.
वर्षभरापूर्वी बीआरएसमध्ये गेलेले माजी आमदार चरण वाघमारे यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाला जिल्ह्यातील नेते आधीपासून विरोध करत होते. या नेत्यांचे मत विचारात न घेता वाघमारे यांना पक्षप्रवेश दिल्याने जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या घटनेनंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी मुंबईत आले. या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटून बाजू मांडण्याचा प्रयत्न केला मात्र कुणीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. चरण वाघमारेंना पक्षप्रवेश आणि उमेदवारी देणार असाल तर आम्हा निष्ठावंतांचा पक्षात काय उपयोग असा सवाल या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
"निष्ठावंतांची वज्रमूठ तयार करा"
निष्ठावंतांना डावलून सत्तापिपासू लोकांना पक्षात स्थान मिळत असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांनी केला. शिर्डीच्या सभेत पवार साहेबांनी कार्यकर्त्यांना निष्ठा जपण्याचा संदेश दिला मात्र अनेक पक्ष फिरून आलेल्या चरण वाघमारे यांना प्रवेश देऊन तिकीट निश्चित करताना निष्ठा कुठे गेली हा प्रश्न जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांनी उपस्थित केला. चरण वाघमारे यांना पक्षात प्रवेश देण्याबाबत फेरविचार केला नाही तर सामूहिक राजीनामे देण्याची तयारी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. आज पत्रकार परिषद घेत याबाबत भूमिका स्पष्ट केली जाणार आहे.
चरण वाघमारेंचं सातव्यांदा पक्षांतर
माजी आमदार चरण वाघमारे यांच्या पक्ष प्रवासावरून राजकीय विरोधकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. आजवरच्या त्यांच्या राजकीय वाटचालीत सुरुवातीला ते शिवसेनेत होते, त्यानंतर मनसेत गेले. पुढे विदर्भ विकास परिषदेतही त्यांनी काम केले. त्यानंतरच्या काळात ते काँग्रेसमध्ये गेले. तिथेही फार काळ न रमता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. तिथूनही बाहेर पडून अपक्ष राहून निवडणूक लढवली. त्यानंतर ते भाजपात गेले. तिथे पक्षातील स्थानिक नेत्यांशी बिनसल्याने ते विकास फाऊंडेशन या गटाची स्थापना केली. अलीकडेच वर्षभरापूर्वी चरण वाघमारेंनी बीआरएस पक्षात प्रवेश केला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.