सिंधुदुर्ग - आज माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी भावनिक दिवस आहे. जिथं राणेसाहेबांची सुरुवात झाली, ज्या चिन्हात, त्या पक्षात माझी सेकंड इनिंग सुरू होतेय. महायुतीनं या जागेवर मला पात्र समजलं, त्याचा आनंद आणि समाधान आहे. मी सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानतो. दिलेला शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाळतात हे आज दिसून आले असं सांगत माजी खासदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत निलेश राणेंचा शिवसेनेत प्रवेश झाला. या प्रवेशानंतर निलेश राणे म्हणाले की, मी विरोधकांना कमी लेखत नाही. विरोधकांचा उल्लेख करत नाही. माझ्यासाठी काम महत्त्वाचं आहे. गेल्या १० वर्षात जे मतदारसंघात घडलं नाही तो विकास आपल्याला घडवायचा आहे. जी ओळख स्थानिक आमदाराने पुसून टाकली होती. माझा फोकस माझ्या मतदारसंघावर आहे. कुठल्या व्यक्ती आणि पक्षावर लक्ष नाही. मी लोकांच्या कामासाठी येऊ शकतो यासाठी माझी धडपड आहे. मी विरोधकांच्या स्पर्धेत नाही. हा मतदारसंघ जिंकायला आलोय त्यासाठी जे करायचे ते करणार आहे असं निलेश राणेंनी म्हटलं.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी निलेश यांच्या शिवसेना प्रवेशासाठी तयारी दर्शवल्याबद्दल खासदार नारायण राणे यांचे आभार मानले तसेच निलेश राणे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे महायुती तळ कोकणात अधिक भक्कम झाली. नारायण राणे यांनी स्वतः ज्या शिवसेनेमधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली त्याच शिवसेनेमध्ये आज त्यांचे पुत्र निलेश राणे पुन्हा प्रवेश घेत असल्याने एक वर्तुळ पूर्ण झालं आहे. लोकसभा निवडणुकीत याच कुडाळ शहराने नारायण राणे साहेबाना २६ हजारांचे मताधिक्य मिळवून दिले होते मात्र आजची ही गर्दी पाहता येत्या विधानसभेत हेच मताधिक्य ५२ हजार झाल्याशिवाय राहणार नाही. निलेश राणे यांचा विजय झाल्यानंतर या मतदारसंघात फटाके फुटतील ते पाहण्यासाठी नक्की येऊ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.
दरम्यान, राज्यातील महायुती सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार असून गेल्या दोन वर्षात त्यांना न्याय देण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो, लेक लाडकी लखपती योजना असो, महिलांना एस्टीमध्ये 50 टक्के सवलत असो किंवा शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या अनेक योजना असो त्यातून सर्व वर्गांना सक्षम करण्याचा प्रयत्न केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.