भाजपची २० जागांवर अडचण; अजित पवार गटाच्या आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यास पंचाईत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 05:50 AM2024-09-11T05:50:31+5:302024-09-11T05:52:42+5:30

अजित पवार गटाच्या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली गेली, तर जवळपास २० मतदारसंघांत भाजपमध्ये बंड वा नाराजीची शक्यता वर्तविली जाते.

Maharashtra Election 2024 - If the existing MLA of the Ajit Pawar group are given another chance, there is a possibility of rebellion or displeasure in the BJP in nearly 20 constituencies | भाजपची २० जागांवर अडचण; अजित पवार गटाच्या आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यास पंचाईत

भाजपची २० जागांवर अडचण; अजित पवार गटाच्या आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यास पंचाईत

यदू जोशी

मुंबई - महायुतीतअजित पवार गटाच्या आमदारांना ‘सिटिंग-गेटिंग’ फॉर्म्युल्यानुसार पुन्हा उमेदवारी मिळाली, तर अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीविरुद्ध लढणाऱ्या भाजपची किमान २० मतदारसंघांमध्ये पंचाईत होणार आहे. नव्या मित्रास जागा देताना आपल्यांच्या समजूतीसाठी भाजपला कसरत करावी लागेल.  

राज्यात २०१९ मध्ये भाजप-शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी लढत झाली. अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होती. २०२३ मध्ये राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत आला. आता त्यांच्या आमदारांना पुन्हा संधी द्यायची, तर आपले त्यावेळचे उमेदवार, मेहनत करणारे नेते, कार्यकर्ते यांची मने आणि मते अजित पवार गटाकडे वळविण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे.

नाराजीचे कारण काय?

अजित पवारांशी झालेली युती दुर्दैवी आहे आणि त्यांना सोबत ठेवले, तर विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसेल, असे विधान भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी मध्यंतरी केले होते. अजित पवार यांना सोबत घेतल्याने भाजपचा परंपरागत मतदार नाराज असल्याची चर्चाही सातत्याने होते. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली गेली, तर जवळपास २० मतदारसंघांत भाजपमध्ये बंड वा नाराजीची शक्यता वर्तविली जाते.

नवीन मित्राला जागा देताना मने अन् मते वळविण्याचे भाजपपुढे आव्हान

कुठे काेणती अडचण?

अमरावतीच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके आता अजित पवार गटाकडून लढू शकतात. खोडके यांनी गेल्यावेळी भाजपचे डॉ. सुनील देशमुख यांना पराभूत केले होते. बडनेरामध्ये भाजपचा रवि राणा यांना पाठिंबा असेल, हे स्पष्ट आहे. दोन्ही ठिकाणी भाजप नसेल.  मोर्शी मतदारसंघात भाजपचे डॉ. अनिल बोंडे यांचा देवेंद्र भुयार यांनी ९७९१ मतांनी पराभव केला होता. तेच भुयार आता अजित पवार गटाकडून लढणार असल्याचे चित्र आहे.  

परळी, उद्गीर, अहमदपूर, माजलगाव, अहेरी, मावळ, आष्टी, अकोले, वाई, तुमसर, पुसद, फलटण येथे तेव्हा राष्ट्रवादीचे उमेदवार भाजपविरुद्ध जिंकले होते, ते आज अजित पवार गटात आहेत. याशिवाय तीन अशा जागा आहेत ज्या गेल्यावेळी एकत्रित राष्ट्रवादीने जिंकल्या पण आता महायुतीत त्या अजित पवार गटाला हव्या आहेत. 

या मतदारसंघांमध्ये घासून झाल्या लढती

अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) मतदारसंघात राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे यांनी भाजपचे तत्कालीन मंत्री राजकुमार बडोले यांचा केवळ ७१८ मतांनी पराभव केला होता. आता चंद्रिकापुरे यांना महायुतीने पुन्हा संधी दिली, तर बडोले काय करणार हा प्रश्न आहे. पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांनी भाजपचे जगदीश मुळीक यांचा ४,९९५ मतांनी पराभव केला होता. इंदापूरमध्ये माजी मंत्री भाजपचे हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादीचे दत्ता भरणे यांनी ३,१०० मतांनी पराभव केला होता. कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांनी भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचा  ८२२ मतांनी पराभव केला होता.

Web Title: Maharashtra Election 2024 - If the existing MLA of the Ajit Pawar group are given another chance, there is a possibility of rebellion or displeasure in the BJP in nearly 20 constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.