मुंबई - आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असताना अद्याप महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यातच काँग्रेसला पक्षांतर्गत गटबाजीनं ग्रासलं आहे. मुख्यमंत्री, मंत्रिपदे आणि महत्त्वाच्या महामंडळासाठी आतापासूनच लॉबिंग सुरू झालं आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये गुप्त बैठका होत असल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेस नेत्यांच्या महत्वाकांक्षेमुळे पक्षाला विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांनुसार, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसची कामगिरी सुधारली. गेल्या निवडणुकीत फक्त १ जागा निवडून आणणाऱ्या काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत तब्बल १३ जागा मिळाल्या. त्यात एक अपक्ष खासदारही काँग्रेससोबत आलेत. महाराष्ट्रात सर्वाधिक खासदार निवडून आल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेस जास्तीत जास्त घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. लोकसभेचा निकाल पाहता काँग्रेसला विधानसभेत अधिकच्या जागा लढवायच्या आहेत. मविआच्या जागावाटपाच्या बैठकीत त्यासाठी काँग्रेस नेते आग्रही आहेत. त्यातच सरकार येणार या आत्मविश्वासात काँग्रेस नेते आतापासूनच मुख्यमंत्रिपदापासून इतर महत्त्वाच्या पदांसाठी लॉबिंग करत आहेत.
समर्थकांच्या गुप्त बैठका, मुख्यमंत्रिपदासाठी चढाओढ
मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसमध्ये अनेक दिग्गज नेते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. काही प्रमुख नेत्यांनी या पदासाठी आपला दबाव राहावा यासाठी पक्षांतर्गत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणुकीतील संभाव्य उमेदवारांपर्यंत काही नेते संपर्क साधत आहेत. समर्थनाच्या बदल्यात काहींना मंत्रिपदे, महामंडळे आणि इतर समित्यांवर नेमणूक करण्याची ऑफरही दिली जात आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप अनिश्चित असताना दुसरीकडे काँग्रेस पक्षाचं दबावतंत्राचं राजकारण सुरू असल्याचं पुढे आले आहे. वैयक्तिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी नेत्यांनी लॉबिंग सुरू केले आहे. इतकेच नाही तर काही नेत्यांनी त्यांच्या समर्थकांसोबत गुप्त बैठकाही घेऊन निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करत पक्षाच्या प्रचाराचा आढावा घेतला आहे.
दरम्यान, दिल्लीतल्या काँग्रेस नेतृत्वाकडे महाराष्ट्रातील पक्षांतर्गत हालचालींबाबत जाणीव करून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात निवडणुकीआधीच काँग्रेस नेत्यांमध्ये सत्तासंघर्ष पेटल्याचे चिन्ह आहे. हायकमांडने एकसंध आघाडी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरी पक्षांतर्गत गटबाजीची वेळीच दखल न घेतल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला फटका बसण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीवर परिणाम
काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार यांच्या महाविकास आघाडीत जागावाटपाचा न सुटलेला तिढा काँग्रेसची डोकेदुखी वाढवणारा आहे. पक्षाच्या लोकसभेतील कामगिरीमुळे आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेस नेत्यांकडून अधिकच्या जागांसाठी आग्रह होत आहे. त्यामुळे आघाडीत अद्याप जागावाटप सुटलेले नाही. त्यातच हरियाणाच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालेला दिसतो. काँग्रेसला स्वबळावर लढायचं असेल तर त्यांनी जाहीर करावे, इतर पक्ष त्यांची भूमिका घेतील असं उघडपणे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला म्हटलं आहे.
संभाव्य प्राथमिक यादी तयार
विधानसभेसाठी काँग्रेसनं संभाव्य उमेदवारांची प्राथमिक यादी आधीच तयार केली आहे. वरिष्ठ नेते येत्या काही दिवसांत या इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होण्याची अपेक्षा आहे. काँग्रेसमधील विविध गट प्रमुख मतदारसंघावर नियंत्रण ठेवण्यासाठी धडपडत आहेत. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशी पक्षांतर्गत गटबाजी रोखून एकसंध आघाडी ठेवण्यात काँग्रेस नेतृत्व सक्षम होईल का हे पाहणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्रिपदासाठी कुठलीही लढाई नाही, काँग्रेसनं फेटाळला दावा
मुख्यमंत्रिपदावरून आमच्या पक्षात कुठलीही अंतर्गत लढाई नाही. इच्छुक उमेदवार आपापल्या नेत्यांना भेटून उमेदवारी मागत आहेत. मात्र नेत्यांमध्ये सामंजस्याने निर्णय घेतले जात आहे. कुठलाही वाद नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत जो काही निर्णय असेल तो निवडणुकीनंतरच घेतला जाईल. सध्या महाराष्ट्रातून भाजपाचं सरकार घालवणं यासाठी काँग्रेसचं प्राधान्य आहे असं सांगत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी गटबाजीचा दावा फेटाळून लावला.