Maharashtra Election Jayant Patil News : 'कुठल्याही परिस्थिती अधिकृत उमेदवारांसाठी ताकद लावली पाहिजे', असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी बंडखोरांना बळ देणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधला. काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
औदुंबर येथे महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेसचे विश्वजित कदम यांच्या प्रचारार्थ सभा झाली. या सभेत बोलताना जयंत पाटलांनी महायुतीवर टीकास्त्र डागलं. तर महाविकास आघाडीच्या नेते, पदाधिकाऱ्यांचे अप्रत्यक्षपणे कान टोचले.
जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला
"आम्ही लहानपणापासून इतिहास काय वाचला की, महाराष्ट्राची स्वारी छत्रपती शिवाजी महाराज हे गुजरातला गेले आणि तिथली संपत्ती आणून महाराष्ट्रातील किल्ले उभे करण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले. पण, देवेंद्र फडणवीस अमित शाहांना बरं वाटावं म्हणून सांगतात की, लुटायला नव्हते आले, आपली भेट घ्यायला आले होते. गुजरातच्या पुढे किती मान खाली घालायची? त्यांना खुश करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हे बदलायला लागले", असा टोला जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.
गटबाजीवर भाष्य, जयंत पाटील काय बोलले?
"आपण एकत्रितपणानं, एकसंघपणानं आपले छोटे-छोटे वाद, एकमेकांच्या विरोधात लढणं, छोटं राजकारण थोडंस बाजूला ठेवा. लढायला भरपूर आयुष्य आहे सगळ्यांना. आता मात्र काँग्रेसचा उमेदवार, राष्ट्रवादीचा (शरद पवार) उमेदवार, शिवसेनेचा (ठाकरे) उमेदवार या महाराष्ट्रात उभा करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करू", असे म्हणत जयंत पाटलांनी महाविकास आघाडीतील गटबाजीवर भाष्य केलं.
सत्ता गेली, तर कुत्रही विचारणार नाही -जयंत पाटील
ते म्हणाले, "थोडंस मोठं मन ठेवा. काही भांड्याला भांड लागलं असेल, तर थोडंस बाजूला ठेवा आणि कुठल्याही परिस्थितीत अधिकृत उमेदवारांसाठी आपण सगळ्यांनी ताकद लावली... एक-एक आमदार महत्त्वाचा आहे सांगतोय. एकदा का सत्ता गेली ना, कुत्र पण विचारणार नाही. एक सांगतो लय गंमती करू नका. कदम साहेब असं म्हणायचे. एकदा घोटाळा झाला ना, भरून येणार नाही. आणि जेवढे आम्ही आज आवाज काढून बोलतोय, असली माणसं परत आवाज काढणार नाही. निवांत घरात जाऊन बसतील. रिटायर होतील", असे जयंत पाटील म्हणाले.
मुख्यमंत्रिपदाबद्दल जयंत पाटील काय म्हणाले?
"छोट्या-छोट्या गोष्टी मन अडकवू नका. आपण सगळ्यांनी ताकद लावली, तरच सरकार येणार आहे. सरकार आल्यानंतर तुम्हाला पाहिजे, त्याला मुख्यमंत्री करा. काही घाई नाही कुणाची", अशा शब्दात जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना काम करण्याच्या सूचना दिल्या.