Maharashtra Assembly Election 2024: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच काँग्रेसच्या रक्तात आहे. आतापर्यंत काँग्रेसने महाराष्ट्राला लुटण्याचेच काम केले आहे, असे टीकास्त्र बावनकुळे यांनी काँग्रेस आणि मल्लिकार्जून खरगे यांच्यावर डागलं.
मल्लिकार्जून खरगे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी मल्लिकार्जून खरगे यांनी भाजप आणि महायुतीवर निशाणा साधला. खरगे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमचे रक्त काँग्रेसच्या रक्तासारखे नाही, असा पलटवार केला.
काँग्रेसकडे अजेंडाच नाहीये -बावनकुळे
"खरगेजींच्या पक्षाने आजपर्यंत महाराष्ट्राला लुटले आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे काँग्रेसचं रक्त आहे. त्यांचं रक्त आहे, तसेच बोलतील. आमचं रक्त तसं नाहीये. आम्ही महाराष्ट्राला देशातील सर्वात चांगलं राज्य बनवू इच्छितो. १४ कोटी जनतेचा विकास हा आमचा अजेंडा आहे. काँग्रेसकडे कोणताही अजेंडा नाहीये. पैसा कमवायचा आहे, सत्ता आणायची आहे. सत्तेतून पैसा आणायचा हाच त्यांचा अजेंडा आहे", असे ते म्हणाले.
महाविकास आघाडी आणि महायुतीने जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. त्यामुळे एकमेकांच्या जाहीरनाम्यातील घोषणांवरून दोन्ही आघाड्या आता एकमेकांना लक्ष्य करताना दिसत आहे. दोन्ही आघाड्या एकमेकांच्या घोषणांबद्दल प्रश्न उपस्थित करून कोंडी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.